(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhaskar Bhagare on Majha Katta : दिंडोरीत कांदा प्रश्नाचा फायदा झाला का? खासदार भास्कर भगरेंनी सांगितलं विजयाचं गणित!
Bhaskar Bhagare on Majha Katta : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी 'माझा कट्टा' कार्यक्रमात निवडणुकीत कांदा प्रश्नाचा फायदा झाला का? याबाबत वक्तव्य केले आहे.
Bhaskar Bhagare on Majha Katta : दिंडोरीच्या निवडणुकीत (Dindori Lok Sabha Constituency) कांद्याचा (Onion) फार मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांची आर्थिक गणित कांदा पिकावरच अवलंबून आहेत. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांची आर्थिक गणितं अत्यंत डळमळीत झाली. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आल्याचे मत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी व्यक्त केले. ते एबीपी माझाचा 'माझा कट्टा' (ABP Majha Katta) या विशेष कार्यक्रमात बोलत होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) कांद्याचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आले. केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी घालताना सरकारने 31 मार्चपर्यंत बंदी उठवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, सरकारने 31 मार्चला बंदी उठवली नाही. जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कांद्याची निर्यात बंदच राहणार असल्याचे सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यातच दिंडोरी ही कांद्याची बाजारपेठ असून कांद्याच्या प्रश्नाभोवतीच दिंडोरी लोकसभेचे निवडणूक रंगली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंनी विजयाचा गुलाला उधळला. त्यांच्यासमोर भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांचे आव्हान होते. मात्र भास्कर भगरेंनी तब्बल 1 लाख 13 हजारांच्या फरकाने भारती पवारांचा पराभव केला.
निवडणुकीत कांद्याचा फार मोठा वाटा : भास्कर भगरे
दिंडोरीत कांदा प्रश्नाचा फायदा झाला का? याबाबत भास्कर भगरे म्हणाले की, या निवडणुकीत कांद्याचा फार मोठा वाटा आहे. पिंपळगाव बसवंतला निवडणुकीच्या सांगता सभेत माजी आमदार अनिल कदम यांनी मला सांगितले होते की, सर तुम्ही निवडून आले तर पहिले कांद्याचा देव करून देवघरात ठेवा. कांदा हे पिक मतदारसंघात फार मोठे आहे. कळवण, देवळा, निफाड, येवला, लासलगाव, नांदगाव, मालेगाव या भागात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने उन्हाळ कांदा किंवा लाल कांदा या पिकावरच आर्थिक गणित अवलंबून आहेत. ते आर्थिक गणित कोरोनाच्या काळात अत्यंत डळमळीत झाली. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. दिंडोरीत रेल्वेचा प्रश्न, तरुणांचे आणि महिलांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न तर आहेच मात्र कांद्याचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे, असे त्यांनी म्हटले.
इतर महत्वाच्या बातम्या