अजित पवारांचा 2 दिवसीय बीड दौरा; मॅरेथॉन बैठका, सोळंके - मुंडेंची गटबाजी, अजित दादांच्या लिस्टवर नेमकं काय ?
Beed :अजित दादांचा दौरासाने जिल्हा प्रशासनासह पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे

Beed : उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार दोन दिवसांच्या बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. अजितदादांचा दौरा असल्याने जिल्हा प्रशासनासह पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शहराचे बकाल रूप समोर येऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाची धडपड सुरू आहे. अजित पवार ज्या मार्गावरून येणार आहेत. ते मार्ग सकाळपासूनच चकाचक करण्यात आले आहे.दुसरीकडे अजित दादांच्या दौऱ्यानिमित्त मुंडे आणि सोळंके यांच्यातील गटबाजी समोर आली. त्यामुळे मुंडे आणि सोळंके यांच्यातील नाराजी पालकमंत्री अजित पवार दूर करणार का? हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे .
मॅरेथॉन बैठका, अजित दादांच्या लिस्टवर नेमकं काय?
आज दुपारपासून(6ऑगस्ट ) अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात होणार असून रात्री आठ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवारांच्या मॅरेथॉन बैठका घेणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने बीड मधील ठेवीदारांच्या पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी आढावा बैठक होणार आहे. तर विद्युत, क्रीडा विभागाचा देखील अजितदादा आढावा घेतील. दरम्यान, आज अजित पवार मुक्कामी असणार असून उद्यादेखील दिवसभर त्यांचे कार्यक्रम बीडमध्ये आहेत.
सोळंके - मुंडे बॅनरवॉर अन् नाराजी
अजित दादांच्या दौऱ्यानिमित्त मुंडे आणि सोळंके यांच्यातील गटबाजी समोर आली. आमदार सोळंके यांच्या बॅनरवर धनंजय मुंडे यांना स्थान नव्हते. तर धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर प्रकाश सोळंकेंना वगळण्यात आलं. ही बाब समोर आल्यानंतर अजित दादा येणाऱ्या मार्गावर केवळ एकाच बॅनरवर मुंडे आणि सोळंके यांचे फोटो दिसून येत आहेत. त्यामुळे मुंडे आणि सोळंके यांच्यातील नाराजी अजित पवार दूर करणार का? याकडे देखील लक्ष लागले आहे.
मराठा समाजाचा असल्यामुळे मंत्रिपद मिळत नसल्याची खंत
गेल्या पाच टर्म पासून आमदार असणारे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या गळ्यात काही वर्षांपासून मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. आता त्यांनी मराठा समाजाचा असल्यामुळे मंत्रिपद मिळत नसल्याची भावना व्यक्त केली होती. "मला मंत्रीपद मिळत नाही, कारण माझी जात आडवी येते. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव असल्याचे दिसते आहे. इथे बहुजन समाजाला स्थान द्यायचे नाही, अशी पक्षाची भूमिका असावी.' असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली होती.
त्यानंतर आता दोन्ही गटात कटुता अधिकच वाढली असून, तिचं पडसाद बॅनर वॉरच्या रूपाने उघडपणे दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार 6 ऑगस्ट रोजी बीड दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी बीडमध्ये विविध ठिकाणी पोस्टर आणि बॅनर लागले आहेत. मात्र, या बॅनरवरून एकमेकांना डावलण्याचे राजकारण सुरु झाले आहे. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर आमदार प्रकाश सोळंके यांचे फोटोच दिसत नाहीत. तर दुसरीकडे, प्रकाश सोळंके यांच्या गटाकडून वडवणीतील मुंडे पिता-पुत्रांचा पक्षप्रवेश दाखवणाऱ्या बॅनरवर खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनाच डावलण्यात आले आहे.























