Ajit Pawar : अशा विकृतांचे सामानच काढून टाकलं पाहिजे, अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट
Ajit Pawar On Badlapur School Crime : "काही नराधम आणि विकृत माणसं काही गोष्टी करतात. त्याला लाडकी बहीण योजनेशी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात. माझी विरोधकांना पण विनंती आहे. वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या."
Ajit Pawar On Badlapur School Crime : "काही नराधम आणि विकृत माणसं काही गोष्टी करतात. त्याला लाडकी बहीण योजनेशी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात. माझी विरोधकांना पण विनंती आहे. वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या. मी कोणत्याही घटनेचं समर्थन करणारा नाही. जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे. तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या. त्याची फिकीर आम्ही करणार नाही. त्याला आम्ही कडक शासन करणार आहोत. आमचा शक्ती कायद्यासाठी प्रयत्न सुरु आहे, राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी गेलाय. अशा प्रकारची विकृत माणसं जेव्हा आमच्या आया-बहिणींवर हात टाकतात, त्यावेळी त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर अशा विकृतांचे सामानच काढून टाकलं पाहिजे", असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. राज्यातील अत्याचाराच्या घटनांनंतर त्यांनी संताप व्यक्त केलाय. ते यवतमाळमध्ये (Yavatmal) बोलत होते. शहरी भाग, ग्रामीण भाग, विदर्भ, मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र , कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र कोठेच कायदा व सुव्यवस्था अडचणीत येता कामा नये. यासाठी कडक कारवाई केले जातात, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
राज्याच्या विकासासाठी मी कधी निधी कमी पडू दिला नाही
अजित पवार म्हणाले, नुकताच मी जो राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, त्यातून सर्व समाजघटकाला आम्ही काय दिलं, कोणकोणत्या अभिनव योजना देऊ केल्या, त्या सगळ्याची माहिती देण्यासाठी आम्ही ही जन सन्मान यात्रा काढली आहे. आधीचं सरकार असो, आताचं सरकार असो.. मी तेव्हाही अर्थमंत्री होतो आणि आताही अर्थमंत्री आहे. राज्याच्या विकासासाठी मी कधी निधी कमी पडू दिला नाही. 2019 ते 2024 या कालावधीत विकास कामांसाठी इंदापूर तालुक्याला 5 हजार 495 कोटी 34 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला.
52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत आम्ही देत आहोत
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आतापर्यंत सव्वा कोटी मायमाऊलींच्या बँक खात्यात दोन महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. याव्यतिरिक्त मुलींच्या उच्च शिक्षणाचा 100 टक्के खर्च सरकार उचलणार आहे. 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत आम्ही देत आहोत. त्याचप्रमाणे माझ्या शेतकरी बांधवांना वीजबिल माफ केलं आहे. बारावी आणि पदवीधर तरुणांना प्रशिक्षण भत्ता सुद्धा आम्ही देत आहोत. अशा अनेक योजना आम्ही राबवत असून त्या पुढेही चालू राहाव्यात यासाठी महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. जे करू ते महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी करू.