(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्र्यांची नव्हे तर अजितदादांची लाडकी बहीण योजना; राष्ट्रवादीचं जोरदार मार्केटिंग, कुरघोडीच्या राजकारणामुळे महायुतीत वाद पेटणार?
CM Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी अजितदादा गट आणि शिंदे गटात चढाओढ सुरु झाली आहे. अजितदादा गटाच्या जाहिरातीमधून महायुतीच्या सर्व नेत्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत महिलावर्गाच्या मतांच्यादृष्टीने गेमचेंजर ठरु शकणाऱ्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'वरुन महायुतीमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. या लढाईत अजितदादा गट आणि शिंदे गट (Shivsena Shinde Camp) आमनेसामने उभे ठाकले आहेत. अजित पवार सध्या जनसन्मान यात्रेच्यानिमित्ताने राज्यभरात फिरत आहेत. याशिवाय, महिला मतदारांना आकृ्ष्ट करण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुरु केलेले 'पिंक पॉलिटिक्स' चर्चेचा विषय ठरत आहे. यानंतर आता अजित पवार यांनी थेट लाडकी बहीण योजनेचे (CM Ladki Bahin Yojana) श्रेय एकट्यानेच घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावरुन नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 'मुख्यमंत्री' हा शब्द वगळून 'दादाचा वादा' अशी टॅगलाईन वापरत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात आला आहे. तसेच 'अजित पवारांची लाडकी बहीण योजना' असा उल्लेखही जाणीवपूर्वक जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. या जाहिरातीमधून महायुतीच्या सर्व नेत्यांना वगळण्यात आले आहे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच या योजनेसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी आणि महिलांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. या माध्यमातून अजित पवार यांच्याकडून जास्तीत जास्त महिलांना आपल्या पक्षाकडे आकृष्ट करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. मात्र, यावरुन आता अजितदादा गट आणि शिंदे गटात जुंपण्याची चिन्हं आहेत.
वादानंतर शिंदे गट आणि अजितदादा गटाचे नेते काय म्हणाले?
अजितदादा गटाच्या या कृतीमुळे महायुतीत गैरसमज निर्माण होऊ शकतात. कार्यकर्त्यांचं आपल्या नेत्यावरील प्रेम मी समजू शकतो. परंतु, एखादी योजना आणि घोषणा सर्वांनी त्याला साथ दिली पाहिजे. अर्थमंत्री आणि गृहमंत्री यांचा प्रमुख मुख्यमंत्री असतात. श्रेय अजितदादांचं पण आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं आहे. राज्य मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर केली आहे. त्यामुळे अजितदादा गटाच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात योजनेचा प्रचार करताना अजित पवारांचा मोठा फोटो लावावा. पण अशाप्रकारच्या कृत्यांमुळे महायुतीत गैरसमज निर्माण होतात, असे मत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.
मात्र, अजितदादा गटाकडून हे आरोप फेटाळणयात आले आहेत. राज्यातील काही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने आहेत. या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि समजण्यासाठी त्या योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडली. त्यांना उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही मांडता आली असती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे या योजनेचे नाव आहे. सरकारी दफ्तरी तशी नोंद आहे. फॉर्म भरायला गेल्यास त्यावरही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असा उल्लेख आह, असे अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी म्हटले.
माझी बहीण होणार स्वावलंबी,
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 3, 2024
स्वतः च्या पायावर उभी राहणार!
तिला बळ देण्यासाठी 'माझी लाडकी बहीण योजना'
या योजनेच्या अधिक माहितीसाठी
खालील लिंकवर क्लिक करा.https://t.co/nwrTtsnBK2#MahaRashtrawadiHelpline#महाराष्ट्रवादी_हेल्पलाइन pic.twitter.com/Or0JeMDl82
आणखी वाचा