(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज ठाकरेंसोबत युती करताना नातं आडवं येतं का? मनसे सोबतच्या युतीवर आदित्य ठाकरे स्पष्ट म्हणाले...
Majha Maharashtra Majha Vision : ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मनसे-शिवसेना युतीर भाष्य केलं आहे.
मुंबई : शिवसेना (Shivsena) - मनसे (MNS) युतीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाष्य केलं आहे. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी मनसे-शिवसेना युती, आघाडी सरकार, भाजप, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. शिवसेना-मनसे युतीमध्ये नातं आडवं येतं का? या प्रश्वावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, मुळात नातं आडवं येतं टीका करताना, आम्ही कधी टीका करणार नाही. नातं असल्यामुळे आम्ही काही बोलणार नाही. आम्ही इतक्या वर्षांत टीका केलेली नाही. आम्ही जिथे आहोत, तिथेच आहोत.
शिवसेना-मनसे युतीमध्ये नातं आडवं येतं का?
शिवसेना-मनसे युतीमध्ये नातं आडवं येतं का या प्रश्नावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुळात नातं आडवं येतं टीका करताना, आम्ही कधी टीका करणार नाही. आता जर-तरमध्ये जाऊन काय उपयोग आहे. आता आपली 20 मे रोजी जी निवडणूक आहे, त्यामध्ये आता मशाल आणि हाताला मतदान करायचं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींबद्दल काय म्हणाले आदित्य ठाकरे?
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, जर उद्धव ठाकरेंना कधी त्यांना गरज पडली तर मी त्यांच्या मदतीला जाईन. या पंतप्रधानांच्या वक्तव्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला पण, सवालही उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, की याचा आनंद आहे. वयोमानाप्रमाणे त्यांनी मी खोडणार नाही. त्यांचं पद वेगळं आहे, त्यांचं स्थान वेगळं आहे. ते खरं बोलतायत खोटं बोलतायत यात मला जायचं नाही. पण, एवढंच जर प्रेम असतं, तर आमच्या कठीण काळात तुम्ही आमचा पक्ष फोडला नसता, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना सवाल
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, नातं असल्यामुळे आम्ही काही बोलत नाही, ती डिसेंसी आम्ही पाळतो. आमच्या घरातले ते संस्कार आहेत, पण मनसेच्या कार्यकर्त्यांना मी आवर्जून विचारेन, खरोखर मनापासून विचारतोय, कारण ते एवढे वर्ष भूमिपुत्रांसाठी वगैरे लढत होते, असं ऐकण्यात यायचं. टोलची लढाई सुद्धा भूमिपूत्रांसाठी असेल, मला माहित नाही. पण मुख्य गोष्ट ही आहे की, ज्या भाजपला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
उद्योगधंदे राज्याबाहेर नेणाऱ्यांसाठी काम कराल का?
पाठिंबा देण्यामागे शर्त नाही, कोणत्याही अटी-शर्ती नाही, बिनशर्त पाठिंबा दिलाय. हीच भाजपा गेले दहा वर्ष आणि खास करून गेले अडीच वर्ष या महाराष्ट्राची वाट लावत आहे. जे काही उद्योगधंदे मग वेदांत-फॉक्सकॉन गुजरातला पाठवला, टेक्स्टाईल पार्क, एअरबस स्टाटर, मेडिकल, डिव्हाईस पार्क, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क, टेक्सटाईल पार्क, वर्ल्ड कपची फायनल हे सगळं गुजरातला पाठवलेले आहे. आपल्या इथे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही. त्यांच्याकडे येणारा रोजगार गुजरातला पाठवला आहे, हे बिनशर्त पाठिंब्याचं पॅकेज आहे का आणि तुम्ही त्यांच्यासाठी काम कराल का, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना विचारला आहे.
सगळं गुजरातला चाललंय, त्याला पाठिंबा देणार का?
खरोखर ज्या पक्षासाठी ज्या हेतूसाठी तुम्ही लढत होतात, आंदोलन केली, जेलमध्ये गेलात, भूमिपुत्रांसाठी लाठीकाठी खाल्ली, खूप वेळा मनसे तुमच्यासाठी वकील पण पाठवायची नाही, त्याच कार्यकर्त्यांना मी विचारात आहे, तुम्ही हे सगळं गुजरातला चाललंय त्याला विचारांना तुम्ही पाठिंबा देणार आहात का आणि मतदान करताना तुम्ही तिथे मतदान कराल का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
ज्यांनासोबत यायचं असेल त्यांनी यावं पण...
आम्ही देशाच्या संविधानासाठी आहोत, आमची लोकशाहीसाठी आहोत. देशभरातून ज्यांना योग्य वाटत आहे की, संविधान रक्षण केलं पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे, ज्यांना वाटत आहे, ते आमच्यासोबत येतात, आम्हाला मतदान करतात, तो विश्वास आहे. आम्ही घट्ट राहिलेले आहोत आणि तिथेच आहोत. ज्यांनासोबत यायचं असेल त्यांनी यावं पण, आम्ही तिथे आहोत. आम्ही बिनशर्त पाठिंबा कधी दिला नव्हता, आमची शर्त हिच होती की महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही राखणार म्हणजे राखणार, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :