(Source: ECI/ABP News/ABP Majha)
होय, मला ट्रम्पेटचा लाभ झाला; शरद पवारांची भेट, पवार-पवार एकत्र येण्याबाबत वळसे पाटलांचं सूचक वक्तव्य
मुंबईतील वाय.बी. चव्हाण प्रतिष्टानचा विश्वस्त या नात्याने मी बैठकीला हजर होतो, या बैठकीत शरद पवारांचे मी आशिर्वाद घेतले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walase patil) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली. दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती, त्यानिमित्त वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यावेळी, वळसे पाटील यांनी सध्याच्या निवडणूक निकालावर शरद पवार यांच्याशी थोडक्यात चर्चा केली. यंदाची निवडणूक ही वेगळ्या प्रकारची निवडणूक झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलं, असेही वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या (Sharad pawar) भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. तर, निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचा मला लाभ झाल्याची प्रांजळ कबुलीच वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर दिली. मुंबईतील वाय.बी. चव्हाण प्रतिष्टानचा विश्वस्त या नात्याने वळसे पाटील यांनी आज शरद पवारांसोबत बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी, अतिशय उपयुक्त अशी चर्चा झाल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच, पवार-पवार एकत्र येण्याबाबतही सूचक वक्तव्य केलं.
मुंबईतील वाय.बी. चव्हाण प्रतिष्टानचा विश्वस्त या नात्याने मी बैठकीला हजर होतो, या बैठकीत शरद पवारांचे मी आशिर्वाद घेतले. मी विसरलो की ते काय बोलले, पण आमच्यात राजकिय चर्चा झाली नाही. केवळ यंदाची निवडणूक वेगळी असल्याचं ते म्हणाले, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. तर, विधानसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावरील डमी उमेदवारामुळे तुमचा विजय झाला का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, होय लाभ झाल्याचं सांगत त्यांनी प्रांजळ कबुली दिली. हे खरे आहे की मला ट्रम्पेटचा लाभ झाला, माझ्या इथे ट्रम्पेटने मते घेतली. पण, इतर भागात तसा परिणाम झाला का ते मला माहिती नाही, असेही पाटील यांनी म्हटले.
पवार पवार एकत्र येतील का?
पवार आणि पवार एकत्र येतील का, या प्रश्नावरही वळसे पाटलांनी सूचक वक्तव्य केलंय. आता याला अजून वेळ आहे, कारण आधी मुख्यमंत्री ठरेल, मंत्रीमंडळ ठरेल, मग अधिवेशन होईल आणि त्यानंतर होईल कोणता पक्ष कुठे येतोय वगैरे असे म्हणत पवार-पवार एकत्र येण्याच्या प्रश्नावर त्यांनी सूचक विधान केलंय. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याच्या प्रश्नाबाबत मला माहिती नाही, कोण कुणाच्या संपर्कात आहेत, कोण नाही याची मला माहिती नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. तर, मुख्यमंत्री पदाबाबत आमच्या पक्षाचे आणि इतर पक्षाचे नेते निर्णय घेतील.
दिलीप वळसे पाटलांचा 1100 मतांनी विजय
दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. येथील मतदारसंघात त्यांना निसटता विजय मिळाला. विशेष म्हणजे शरद पवारांनी मतदारसंघात निवडणूक घेऊन गद्दारांना पाडा पाडा पाडा... असे म्हटल्याने मतदारसंघात शरद पवारांच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली होती. त्यातच, निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्याविरोधात एक डमी उमेदवार उभा करण्यात आला होता. त्या अपक्ष उमेदवाराचे नावही देवदत्त शिवाजी निकम असंच होतं आणि त्यांचे चिन्ह देखील तुतारीशी मिळते जुळते होते. ज्या ट्रम्पेट चिन्हामुळेच लोकसभेला शरद पवारांच्या अनेक उमेदवारांची मतं कमी झाली. साताऱ्यातील उमेदवाराचा पराभव झाला, त्या आंबेगावातही विधानसभेला तेच घडल्याचं दिसून आलं. डमी उमेदवार असलेल्या देवदत्त निकम यांच्या ट्रम्पेट चिन्हाला तब्बल 2,950 मतं मिळाली. त्यामुळेच, दिलीप वळसे पाटील यांना 1100 मतांनी निसटता विजय मिळाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे वळसे पाटील यांनी ते मान्यही केलंय.
हेही वाचा
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?