Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात आज नाशिक महापालिकेत महत्त्वाची बैठक पार पडली.

Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात (Tapovan Tree Cutting) आज सोमवारी (दि. 08) नाशिक महापालिकेत (Nashik NMC) महत्त्वाची बैठक पार पडली. पर्यावरणप्रेमींचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी यांच्यात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्राम (Sadhugram) उभारणीसाठी तपोवनातील वृक्षतोड करावी लागणार, ही मनपा प्रशासनाची भूमिका ठाम आहे. मात्र, पर्यावरणप्रेमींचा या भूमिकेला विरोध आहे. तपोवनातील एकही झाड तोडून देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासन यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे.
नाशिक महापालिका प्रशासनाकडून झाडांबाबत कोणतीही योग्य माहिती मिळाली नसल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. तर एक्झिबिशन सेंटरसाठी झाडं तोडणार नसल्याचा खुलासा मनपा आयुक्तांकडून करण्यात आला आहे. मात्र, त्याबाबतचा जीआर काढण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. बैठक निष्फळ झाल्याने पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच आहे. तर पालिका आयुक्तांनी पर्यावरणप्रमींशी चर्चा सुरूच राहणार असल्याची माहिती दिली आहे.
Nashik Tree Cutting: काय म्हणाल्या मनपा आयुक्त?
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या की, आज आम्ही बैठक बोलावली होती. अजूनही काही पर्यावरणप्रेमीसोबत बैठक घेणार आहोत. काही गोष्टींवर चर्चा झाली. साधूग्रामसाठी झाडी तोडणे हे काही लोकांना मान्य आहे. मात्र काही लोकांना मान्य नाही. आजच्या बैठकीचे व्हिडीओ शूटिंग करण्यात आले आहे. आता सर्व झाडांचा सर्व्हे झाला आहे. अजून उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचा सर्व्हे बाकी आहे. जुने झाडी काढणार नाही. वृक्ष प्राधिकरणाची बैठक होईल, त्यानंतर किती झाडे तोडणार याबाबत आकडा सांगितला जाईल. मागील कुंभमेळ्यामध्ये तीन शेड उभे केले होते. आता देखील टेंट उभे करावेच लागणार आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ही जागा खरेदी केलेली आहे. इथे रिक्रियेशन सेंटर उभे करायचे, असा निर्णय मनपाच्या सर्वसाधारण सभेत झाला होता. 2016 च्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला होता. 11 वर्ष जागेचा वापर करावा. नंतर एक वर्ष ती जागा कुंभमेळ्यासाठी वापरली जाणार, असा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























