पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी, "तुम्ही देशाचं मन जिंकलं"
पंतप्रधान मोदींनी हवाई दलाच्या जवानांना म्हटलं की, तुम्ही देशाचे मन जिंकले आहे. कोरोना कालावधीत भारतीयांना परदेशातून परत आणण्यात हवाई दलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जैसलमेर एअरबेस येथे सैनिकांना उद्देशून भाषण केलं, यात त्यांनी हवाई दलाच्या जवानांच्या धाडसाचे कौतुकही केले. पंतप्रधान मोदींनी हवाई दलाच्या जवानांना म्हटलं की, तुम्ही देशाचे मन जिंकले आहे. कोरोना कालावधीत भारतीयांना परदेशातून परत आणण्यात हवाई दलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तुम्ही देशाचं मन जिंकलं, असं मोदींनी जैसलमेरमधील लोंगेवाला चौकात सैनिकांना संबोधित करताना म्हटलं.
कोरोना संकटाच्या वेळी जेव्हा चीनमधील वुहानला जाण्याचे आव्हान होते, तेथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशात आणायचे होते. तेव्हा आपले हवाई दलाचे सैनिक पुढे आले. केवळ भारतीय नागरिकच नव्हे तर हवाई दलाच्या जवानांनी परदेशी नागरिकांनाही मदत केली, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
कोरोना कालावधीत सतत क्षेपणास्त्र चाचणी चालू राहिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांना उद्देशून म्हणाले की, कोरोना काळातील लस बनवण्याचा प्रयत्न करणारे वैज्ञानिक तसेच क्षेपणास्त्र बनविणाऱ्या वैज्ञानिकांनीही देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या काळात क्षेपणास्त्र चाचणीच्या बातम्या सतत सुरू राहिल्या. आपण कल्पना करू शकता की गेल्या काही महिन्यांत देशातील शक्ती किती वाढली आहे. सीमेवर राहून तुम्ही केलेले त्याग, तपश्चर्या यामुळे देशात विश्वास निर्माण होतो की सर्व एकत्र आल्यास मोठ्यातल्या मोठ्या आव्हानाचा सामना करता येतो.
भारताची रणनीती आज स्पष्ट आहे. आजचा भारत समजून घेण्याच्या आणि समजावण्याच्या धोरणावर विश्वास ठेवतो. परंतु जर आम्हाला आजमावण्याचा प्रयत्न केला तर उत्तर तितकेच भयंकर मिळते, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.