PM Modi : पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यावर पोलिसांकडून विशेष खबरदरी; बीडीएस पथकाकडून दीक्षाभूमीची पाहणी, कसा असेल पंतप्रधानांचा दौरा?
Nagpur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा निश्चित झाला असून या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक (BDDS) पथकाने आज दीक्षाभूमी मध्ये जाऊन सुरक्षेचा प्राथमिक आढावा घेतला.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा निश्चित झाला असून या दौऱ्यात ते ऐतिहासिक दीक्षाभूमीला ही भेट देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक (BDDS) पथकाने आज दीक्षाभूमी मध्ये जाऊन सुरक्षेचा प्राथमिक आढावा घेतला. यावेळी बीडीएसच्या पथकाकडून दीक्षाभूमीच्या प्रत्येक काना कोपऱ्याची पाहणी केली. पंतप्रधानांची विशेष सुरक्षा आणि नुकतच नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा अत्यंत चोख ठेवणार आहे. दरम्यान महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून दीक्षाभूमी आणि परिसरात स्वच्छता, रंगरंगोटी आणि इतर कामांची सुरुवात करण्यात आली आहे.
कसा असेल पंतप्रधानांचा नागपूर दौरा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात चार ठिकाणी जातील.
सकाळी 8:30 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह प्रोटोकॉल प्रमाणे स्वागत स्वीकारून सुमारे 8:40 वाजता पंतप्रधान थेट रेशीमबागला रवाना होतील.
सकाळी साधारण 9:00 वाजता रेशीम बाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात आगमन होईल.
या ठिकाणी पंतप्रधान संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला वंदन करतील. या ठिकाणी संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मोदींचे स्वागत करत त्यांना माहिती दिली जाईल.
त्यानंतर 9:30 वाजता पंतप्रधान मोदी यांचे दीक्षाभूमीला आगमन होईल. या ठिकाणी साधारण 15 मिनिटं पंतप्रधान थांबतील.
10:00 ते 11:30 वाजता दरम्यान मोदी वासुदेव नगर परिसरातील माधव नेत्रालयच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहतील. या ठिकाणी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी विशेष हेलिकॉप्टरने नागपूर - अमरावती रोडवरील "सोलार एक्स्प्लोसिव्ह कंपनी"च्या उत्पादन प्रकल्पाला पोहोचतील. ही कंपनी भारतीय सैन्यासाठी विशेष बॉम्ब आणि इतर शस्त्र तयार करणारी कंपनी आहे.
सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीतून पंतप्रधान हेलिकॉप्टरने विमानतळ ला पोहोचतील आणि साधारण दुपारी 1:30 वाजता ते पुढील दौऱ्यासाठी छत्तीसगडला रवाना होतील.
पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक एका व्यासपीठावर एकत्र येणार
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान रेशीमबागेच्या स्मृती मंदिर स्थळाला भेट देवून डॉ. हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार असल्याची माहिती, यावेळी १५ मिनीट मोदीजी स्मृती मंदिर परिसरात राहणार आहे. या दौऱ्यात पंतप्रघान मोदीजी दीक्षाभूमी येथे येऊन, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राजकीय जीवनात प्रवेश करण्यापूर्वी संघात पूर्णवेळ प्रचारक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपुरात एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. संघाचे हे शताब्दी वर्ष असल्याने मोदींची ही भेट फार महत्त्वाची ठरणार आहे.
हे ही वाचा




















