Parbhani News : गुन्हे नोंदवतात म्हणून परभणीतील बालविवाह दुसऱ्या जिल्ह्यात लावण्याचा धडाका
Parbhani News : परभणी जिल्ह्यात एप्रिल महिन्यात 45 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
Parbhani News : गेल्या काही दिवसांपासून परभणी (Parbhani) जिल्हा प्रशासनाकडून बालविवाह विरोधात कारवाईचा धडाका लावल्याचं पाहायला मिळत आहे. तर परभणी जिल्हा प्रशासनाने 'बालविवाहमुक्त परभणी' हा ध्यास घेतल्याने जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाहांवर बहुतांश प्रमाणात प्रतिबंध आला आहे. याबाबत थेट कारवाई होत असल्याने वधू-वर या दोन्ही पक्षांकडील मंडळी आता सोयीनुसार निर्णय घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून परभणीत बालविवाहावर निर्बंध आले असले, तरी शेजारील जिल्ह्यांत संबंधित विवाह लावण्यात येत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्यामुळे ते कसे रोखता येतील, त्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले. बुधवारी (17 मे) जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
शेजारील जिल्ह्यात बालविवाह लावत असल्याचं समोर
परभणी जिल्ह्यात एप्रिल महिन्यात 57 बालविवाहांची माहिती महिला व बालविकास विभागाकडे 1098 आणि इतर स्त्रोतामार्फत मिळाली. त्यापैकी 45 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आले असून, यापैकी 25 प्रकरणांची माहिती बाल कल्याण समितीकडे सादर करण्यात आली आहे. तर 45 कुटुंबांचे याबाबत समुपदेशन करण्यात आले आहे. बालकल्याण समितीकडे सहा बालविवाहांच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र या कारवानंतर शेजारील जिल्ह्यांत संबंधित विवाह लावण्यात येत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्यामुळे असे विवाह रोखण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सूचना केल्या आहेत.
यापुढे सर्व विभागांकडून जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रत्येकी 10 असे एकूण 50 चॅम्पिअन्सची नियुक्ती करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडून सांगण्यात आले आहे. बालविवाहमुक्त अभियानात सहभागी पंचायत विभाग, शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा महिला व बालविकास यांच्यामार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या चॅम्पिअन्सची नावे व संपर्क क्रमांक तात्काळ कळवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांना यावेळी दिल्या. त्याचबरोबर जिल्हा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मूल्यमापन आढावा गुगल फॉर्म 100 टक्के भरण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यांचे निराकरण करुन एकत्रित माहिती भरण्यासाठी हे चॅम्पियन्स सक्रिय राहतील, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत यांची उपस्थिती...
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड, उपशिक्षणाधिकारी धनराज येरमाळ, अरविंद आकांत, जिल्हा समन्वयक विकास कांबळे यांच्यासह बालविवाह निर्मूलन समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Hingoli: हिंगोलीत प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वेळेवर दोन बालविवाह थांबविण्यात यश