Hingoli: हिंगोलीत प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वेळेवर दोन बालविवाह थांबविण्यात यश
Hingoli News : बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती प्रशासनास मिळताच हे बालविवाह थांबवण्यास यश मिळाले आहे.
Hingoli News : महिला आणि बाल विकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बाल कायद्याची जनजागृती करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी बालविवाहाचे (Child Marriage) प्रकार घडत आहेत. याच दरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे अंजनवाडा येथील युवक परभणी जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह करणार असल्याची, तसेच मौजे बोथी, ता. कळमनुरी येथील अल्पवयीन मुलीचे मौजे सुकापुर, ता. औंढा नागनाथ येथे बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती प्रशासनास मिळताच हे बालविवाह थांबवण्यास यश मिळाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात दोन ठिकाणी बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण विभागाचे अधिकाऱ्यांसह औंढा पोलीस आणि आखाडा बाळापूर पोलिसांना याबाबत माहिती देऊन त्यांच्या मदतीने संबंधित गावात दाखल झाले. यावेळी अंजनवाडा येथे भेट दिली असता वरील दोन्ही ठिकाणी लग्नाचा मांडव तसेच आचारी स्वयंपाक करताना दिसून आले. तसेच पथकाने मुलीच्या वयाची खात्री केली असता ती अल्पवयीन असल्याचे समोर आले.
त्यामुळे संबंधित बाल वधूंचे आई-वडील आणि वराकडील सर्व नातेवाईक वऱ्हाडी मडळी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी माहिती सांगण्यात आली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात. अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड आणि दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते, असे सांगून नियोजित बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले. अशा प्रकारे जिल्ह्यात अंजनवाडा आणि बोथी या ठिकाणी दोन बालविवाह थांबवण्यात आले आहेत.
मुलीच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत नियमित पाठपुरावा
तर दोन्ही बालिकेला पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर मुलीचे वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत बालकल्याण समिती हिंगोली कडून दर महिन्याला मुलीबाबत पाठपुरावा करण्यासंदर्भात सूचना महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास देण्यात आले. त्यानुसार बालिकेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि सामाजिक स्थिती, सद्यस्थिती बाबत वेळोवेळी माहिती बाल कल्याण समितीला कळविण्याचे सांगण्यात आले. दोन्ही मुलीच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत नियमित पाठपुरावा घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: