Palghar News: पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कामाचा शेतकऱ्यांना फटका; 200 एकरवरील रब्बी पिकाचे नुकसान
Palghar News: पालघरमधील वांद्री प्रकल्पाच्या कालव्याची दुरुस्ती न करताच पाणी सोडल्यामुळे जवळपास 200 हून अधिक एकरवरील रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे.
Palghar News: पालघरमधील (Palghar) वांद्री प्रकल्पाच्या कालव्याची (Vandri Cannal) दुरुस्ती न करताच पाणी सोडल्यामुळे पालघर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाचे (Rabi Crop) नुकसान झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे सुमारे 200 एकर पेक्षा जास्त शेतीमधील रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाहणी करण्यासाठी आलेल्या पाटबंधारे विभागाचच्या उपविभागीय अभियंत्याला संतप्त शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तीळ, वाल, चणे, वाटाणे अशी अगदी बहरात आलेली रब्बी पिके, शेतात पाटाचे पाणी भरल्यामुळे कुजून मरत आहेत. यंदा देखील कालव्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे, शिवाय जोपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत पाणी सोडू नये असे बोईसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश पाटील, शेतकरी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत ठरलेले होते. त्यामुळे यंदा देखील शेतकऱ्यांनी ओलिताखाली येणाऱ्या शेतीमध्ये रब्बी पिकांची पेरणी केली होती.
मात्र, पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन आणि कालव्याची दुरुस्ती न करताच, तसेच पाणी सोडू नये याबाबत शेतकऱ्यांनी निवेदने दिलेली असतानाही कालव्याला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पालघर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
पाटबंधारे विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे कुडे, बोट, नावझे, साखरे. दहिसर या गावांमधील सुमारे 200 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी अर्जानंतर पाहणी करण्यासाठी आलेल्या पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंता नीलकमल गवई यांना संतप्त शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
लघुपाट दुरुस्तीचे काम पूर्ण नाही
वांद्री धरणाचा आठ किलोमीटर अंतराचा उजवा कालवा आणि त्यावरील सर्व लघुपाट तसेच डाव्या कालव्यावरील गुंदावे गावच्या हद्दीपर्यंतचे लघुपाट दुरुस्तीच्या 26 कामांची निविदा पाटबंधारे विभागामार्फत काढण्यात आल्या होत्या. निविदा प्रक्रियेत भाग घेतलेला केवळ एक ठेकेदार वगळता बहुतेक ठेकेदारांनी 20 ते 25 टक्के कमी दराने कामे मिळवली होती. मात्र आजपर्यंत यापैकी एकही काम पूर्ण झालेले नाही.
त्यामुळे आता वांद्री प्रकल्पाच्या कालव्यांच्या निकृष्ट आणि अपूर्ण बांधकामाची चौकशी करणार का? नादुरुस्त कालव्यांमधून पाणी सोडल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार मदतीचा हात देणार का, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.