(Source: Poll of Polls)
Palghar News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चिमुकलीसह तिघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
Palghar News : पालघरच्या मेंढवन घाटात कार आणि टँकरच्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
पालघर : मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (Mumbai Ahmedabad National Highway) धोकादायक वळण आणि ब्लॅक स्पॉटमुळे दिवसागणिक धोकादायक होत चालल्याचं पाहायला मिळतंय. अशाच धोकदायक स्थितीमुळे रोजच्या अपघातांच्या प्रमाणात देखील लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यातच गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी पालघरच्या (Palghar) मेंढवन घाटात कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तिघेही एकाच कुटुंबातील असून यामध्ये एका 5 वर्षीय चिमुकलीचा देखील समावेश आहे. तसेच या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आलीये. जखमींवर सध्या उपचार सुरु असून यामधील एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या वळणावर आतापर्यंत अनेक अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा माहामार्ग तयार झाल्यापासून शेकडो जणांनी आपले प्राण गमावलेत. दरम्यान आता झालेल्या अपघातातील लोकं हे पुण्याचे होते.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार 23 नोव्हेंबर दुपारी पालघरच्या मेंढवन घाटात भीषण अपघात झाला. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारवरील ताबा सुटला. त्यामुळे ही कार मेंढवन घाटातील धोकादायक वळणावरुन विरुद्ध दिशेला जाऊ लागली आणि समोरुन येणाऱ्या टँकरला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये संपूर्ण कारचा चुराडा झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन जण गंभीर जखमी झालेत. हर्षद गोडबोले (वय 42), आनंदी गोडबोले (वय 5) आणि वाहन चालक मिलिंद वैद (वय 43) अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तसेच तर हर्षदा गोडबोले (वय 37), अद्वैत गोडबोले ( वय 12) अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान हे सगळे जण पुण्यातील रहिवाशी होते.
अद्याप कोणत्याही उपाययोजना नाहीत?
पालघरजवळ असलेल्या मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या याच वळणावर आतापर्यंत अनेक अपघात झाल्याची माहिती समोर आलीये. तरीही या धोकादायक वळणावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणत्याही उपाययोजना नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. आतापर्यंत याच जागेवर शेकडो लोकांनी प्राण गमावेलत. त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी सध्या स्थानिकांकडून करण्यात येतेय.