Palghar Accident : देव तारी त्याला कोण मारी... भीषण अपघातात कारचा चक्काचूर; सीट बेल्ट लावल्याने पाचही प्रवासी सुखरूप बचावले
Palghar Accident : पालघरमध्ये भीषण अपघातात कारचा चक्काचूर मात्र सीट बेल्ट लावल्याने पाचही प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
Palghar Accident News : देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे मात्र, याच म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघरमधील धानिवरी परिसरात भीषण अपघात घडला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या झालेल्या अपघाती मृत्यू ठिकाणाहून काही अंतरावर धानिवरी येथे फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर मात्र सीट बेल्ट लावल्याने पाचही प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
देव तारी त्याला कोण मारी
चालकाचे भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही फॉर्च्युनर थेट पुढे चाललेल्या कंटेनरवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात फॉर्च्युनर गाडी अर्धी कापली गेली तसंच या भरधाव कारने अपघातानंतर तीन ते चार पलटी देखील खाल्ल्या. मात्र या कारमधील कार चालकासह सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावले असल्याने या कारमधील कोणालाही किरकोळ दुखापत सुद्धा झाली नाही.
सीट बेल्ट लावल्यामुळे बचावले पाचही प्रवासी
विमल मैतालिया हे उद्योगपती आपल्या कारचालक आणि परिवारासह सिल्वासाहून मुंबईकडे जात असताना धानिवरी येथे हा भीषण अपघात घडला. मात्र कारमधील सर्वांचे दैव बलवत्तर म्हणून कोणालाही दुखापत झाली नाही. वाहतुकीचं नियम पाळण्याचे वारंवार आवाहन पोलीस प्रशासन आरटीओ आणि शासनाकडून करण्यात येत आहे. नियम मोडणाऱ्यांना दंडही लावला जातो मात्र. हेच नियम जर कसोशीने पाळले तर आपला जीव आपण स्वतःही वाचवू शकतो हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.
सीट बेल्ट न लावणाऱ्या 83 टक्के कार प्रवाशांचा अपघातात मृत्यू : वाचा सविस्तर
कार अपघातात मृत्यू झालेल्या 10 पैकी 8 प्रवाशांचा मृत्यू हा सीट बेल्ट न लावल्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे. सीट बेल्ट न लावणाऱ्या 83 टक्के कार प्रवाशांचा अपघातात मृत्यू होतो अशी माहिती 2021 मधील आकडेवारीनुसार समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी आणि प्रवासादरम्यान सीट बेल्ट वापरावा.
कार आणि बसचा भीषण अपघात, कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. कार आणि लक्झरी बसमध्ये धडक झाल्यानं अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. कार (Car Accident) आणि लग्झरी बसची (Luxury Bus Accident) धडक होऊन अपघात (Palghar Accident News) झाला होता. कारचालकाचं नियंत्रण सुटल्याने कारनं बसला धडक (Car Collided With Bus) बसली आणि हा अपघात झाला होता. गुजरातहून (Gujarat) मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या मार्गावर हा अपघात झाला.