Eknath Shinde : माझ्या दाढीत अनेकांच्या नाड्या, दाढीवर हात फिरवला की विरोधकांना धास्ती वाटते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कवितेतून कोपरखळी
Palghar Sadhu Murder Case: पालघर साधू हत्याकांडातील कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
पालघर : माझ्या दाढीत अनेकांच्या नाड्या आहेत, दाढीवर हात फिरवला की अनेकांना धास्ती वाटते अशी कोपरखळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विरारमध्ये जागतिक मराठी संमेलनाच्या भाषणात केल्या. साहित्य आणि मराठी माणसाविषयी बोलताना त्यांनी राजकीय विरोधकांवर ही निशाणा साधला.
विरारमध्ये आयोजित जागतिक मराठी संमेलनाच्या भाषणाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कविता करत फटकेबाजी केली. रामदास फुटाणे यांनी शिंदेंवर केलेली कविता वाचली, “दाढीवर हात फिरवीत त्यांनी केला संकल्प, 50 आमदारांचं पुनर्वसन हाच यांचा प्रकल्प,” ही कविता सांगत दीड वर्षापूर्वी केलेल्या बंडाच्या आठवणी ताजा केल्या. हे करायला हिंमत लागते, जिगर लागतो असं सांगतं 50 आमदार, 13 खासदार आणि लाखो कार्यकर्त्यांनी ठेवलेला विश्वास सार्थ करायला लागेल, त्यांना जपायला लागेल असंही सांगितलं.
मुख्यमंत्र्यांचे कवितेतून प्रत्युत्तर
"यह है दाढी की किमया, दुष्टों का कर दिया सफाया" ही कविता म्हणत या दाढीमध्ये बऱ्याच लोकांच्या नाड्या आहेत, नाडी परीक्षण करावं लागतं. आमदार हितेंद्र ठाकूरांनाही ते माहीत आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चिमटा काढला.
त्यानंतर आणखी एक कविता म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आघाडी सरकारचं कौतुक केलं. आमची थोड्याच दिवसांमध्ये महाराष्ट्रात पसरली कीर्ती, कारण आमचं सरकार म्हणजे आम्ही आहोत त्रिमूर्ती," पुन्हा दाढीचा धागा पकडत एकनाथ शिंदे म्हणाले की, मी दाढीवर हात फिरवला तरी कुणाचा घात करत नाही, ही माझ्या कामाची पध्दत आहे.
सध्या खालच्या पातळीवर सुरु असलेल्या राजकारणाबाबत चिंता व्यक्त करताना, उपदेशासाठी कविता करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी रामदास फुटाणे यांना केलं. तर काहींच्या सकाळी 9 वाजताच कविता चालू होतात, अशी कोपरखळी त्यांनी संजय राऊत यांच नाव न घेता लगावली.
पालघर साधू हत्याकांडातील कुटुंबीयांना मुख्यमंत्र्याकडून आर्थिक मदत जाहीर
जागतिक मराठी संमेलनानंतर मुख्यमंत्री विरारच्या क्लब वन येथे कार्यकर्ता मेळाव्याला गेले होते. तेथे पालघर मध्ये झालेल्या साधू हत्याकांडातील मयत साधूंच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली. शिवसेनेच्या या मेळाव्यात साधुंच्या कुटुंबीयांची मुखमंत्र्यांनी भेट घेतली आणि मदतही देण्यात आली.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच वसई विरार मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. नुकतीच शिवसेनेला मान्यता मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह जोरात होता. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ‘घर तिथे शिवसेना, आणि गाव तिथे शिवसेना’ असे घोषणा त्यांनी देऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.
तीन वर्षांपूर्वी पालघरमध्ये साधुंची हत्या करण्यात आली होती. या साधुंच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. या मेळाव्यात त्या कुटुंबीयांचा सन्मानही करण्यात आला. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी साधुंच्या कुटुंबीयांना भेटही नाकारली होती. मात्र आमची खरी शिवसेना असल्याने आम्ही साधुसंतांचा सन्मान करतो असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
ही बातमी वाचा: