Pahalgam Terror Attack: बाप रे! महाराष्ट्रात 5023 पाकिस्तानी, 107 जण बेपत्ता, फक्त 51 पाकिस्तान्यांकडे वैध व्हिसा अन् कागदपत्रे
Pahalgam Terror Attack: राज्यातल्या 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले 18 प्रकारचे सर्व व्हिसा 27 एप्रिलपासून रद्द करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. यानंतर अमित शाह यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करत पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, असे निर्देश दिले आहेत.
अमित शाह यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. राज्यातल्या 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाहीय.
योगेश कदम काय काय म्हणाले?
सध्या महाराष्ट्रात 5 हजार 23 पाकिस्तानी नागरिक आहेत. यातील एक कॉलम अनट्रजसेबल पाकिस्तानी नागरिकांचा आहे. ज्यांच्या व्हीजाची मुदत संपलीय. भारतीय यंत्रणांना त्यांच्याशी संपर्क करुन त्यांना परत पाकिस्तानला पाठवायचे आहे, पण त्यांच्याशी संपर्क होत नाहीय किंवा ते सापडत नाहीयेत अशी हे पाकिस्तानी लोक आहेत, असं योगेश कदम यांनी सांगितले. सार्क व्हीजा आणि शॉर्ट टाईम व्हीजावर असलेल्यांना मात्र दोन दिवसांत म्हणजे 28 तारखेपर्यंत भारत सोडण्यास सांगण्यात आलंय. जे वैद्यकीय उपचारांसाठी आहेत त्यांना दोन दिवस वाढवून देण्यात आलेत . त्यांनी 30 तारखेपर्यंत भारत देश सोडायचा आहे. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करणं अजुन सुरु आहे. त्यामुळे आकडेवारी बदलू शकते, असंही योगेश कदम म्हणाले.
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल. शत्रूचा हल्ला किंवा देशावरील संकटकाळात कायमच सर्व राजकीय पक्ष राहिले, असेच या देशात आजवर झाले. स्व. अटलजींनी स्व. इंदिराजींना संपूर्ण पाठिंबा दिला होता. पण, उबाठाने जे छोटे मन दाखविले, त्याला या देशातील जनता कधीच माफ करणार नाही.























