(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : एकतर्फी प्रेमाच्या नादात, तीन वर्षे कारावासाची शिक्षा
एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करणे आणि तिला त्रास देणे, एका 24 वर्षीय युवकाला चांगलेच महागात पडले आहे. या आरोपीला सत्र न्यायालयाने 3 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
नागपूरः एका 24 वर्षीय तरुणाचे अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मुलीने नकार दिल्याने रागावलेल्या या इसमाने चाकू काढून मुलीच्या हातावर वार करुन तिला जखमी केले. वेदनेने मुलगी ओरडली असता आरोपी शिविगाळ करीत पळून गेला. या आरोपीला सत्र न्यायालयाने 3 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
शाहरुख शेख फिरोज शेख (वय 24) असे आरोपीचे नाव असून तो जय भीमनगर, महादुला येथील रहिवासी आहे. त्याचे पीडित अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्याला त्या मुलीसोबत लग्न करायचे होते, मात्र मुलगी त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास तयार नव्हती. असे असताना आरोपीने तिचा सतत तीन वर्षे पाठलाग केला. तिच्यावर दबाव वाढविण्यासाठी तिला ठार मारण्याची धमकी दिली. तरीही मुलगी घाबरली नाही. त्यामुळे आरोपीचा संयम संपला. 7 जानेवारी 2021 रोजी दुपारी 1च्या सुमारास मुलगी पाणी भरण्यासाठी बोअरवेलजवळ एकटीच उभी असताना आरोपी तेथे गेला. त्याने मुलीला पुन्हा लग्नाची मागणी घातली. मुलीने त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे आरोपीने चिडून स्वतःजवळच्या चाकू मुलीला जखमी करत पळ काढला. त्यानंतर आरोपीविरुद्ध कोराडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी आरोपी तरुणाला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. एस.आर. त्रिवेदी यांनी हा निर्णय दिला. न्यायालयात सरकारच्यावतीने अॅड. कल्पना पांडे यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने पीडित मुलीला पाच हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे.
अशी आहे संपूर्ण शिक्षा
* कलम 354-डी (1) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.
* कलम 324 अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.
* कलम 506 (1) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.
* कलम 294 अंतर्गत तीन महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.