(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari : पाणी साचणाऱ्या रस्त्यावर कंत्राटदाराचे नाव आणि फोन नंबरची पाटी लावा
शहरातील पाणी साचणाऱ्या भागातील रस्त्यांवर संबंधीत विभागाच्या नावाची पाटी लावा. यासोबतच कंत्राटदाराच्या नाव आणि फोन नंबरच्या पाट्या लावा. अशा शब्दांत गडकरींनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.
नागपूरः नियोजन शून्य पद्धतीने करण्यात आलेल्या कामांमुळे शहरातील प्रत्येक व्यस्तीत पाणी साचले असून शहरच तुंबल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वीची अपेक्षित कामे वेळेवर पूर्ण केली जात नसल्याने केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभागावर चांगलेच संतापले. नवीन कामे थांबवा आणि आधी अर्धवट असलेली कामे पूर्ण करुन चिखल होणाऱ्या भागाची दुरुस्ती त्वरित करा, असे निर्देश त्यांनी दिले. नव्या ड्रेनेज लाइनच्या जाळ्याचा प्रस्ताव तयार करा, असे निर्देश देत महापालिकेला देत निधीची तरतूद करून देतो, अशी ग्वाहीही दिली.
या बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आय़ुक्त बी. राधाकृष्णन,एनडीआरएफचे रमेशकुमार, माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. रस्ते बांधकाम करणाऱ्या मनपासह, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपापल्या रस्त्यांची देखभाल करून तुंबलेले पाणी हटविण्याची जबाबदारी मनपासह, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पार पाडायला हवी होती. परंतु गेल्या नऊ दिवसांपासून नागरिकांना मनस्ताप सहन कराला लागत असल्याने गडकरी यांनी सर्वच संस्थांने कान टोचले. लोखंडीपूर, घाटरोड, अजनी पूल या रस्त्यांवर पाणीच पाणी असल्यामुळे दोन्ही बांजूची वाहतूक बंद होती. नरेंद्रनगर पुलाखाली पाणी असल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद होती. लोकांना अन्य मार्गांनी जावे लागले. या भागाची तपासणी व निरीक्षण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावे व पुढे पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही गडकरींनी दिल्या.
अकरा वर्षानंतरही पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्ते अपूर्ण
सिमेंट रस्त्यांची पहिल्या टप्प्याची कामे 2011 ला सुरु झाली. आज 2022 सुरु आहे. पण कामे पूर्ण झाली नाही, या वस्तुस्थितीकडे आमदार प्रवीण दटके यांनी गडकरींचे लक्ष वेधले. प्रकल्पांच्या कामासाठी पैसे आहेत. पण कामे पूर्ण केली जात नाहीत. अनेक रस्त्यांवर व वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचलेले दिसून आल्याचेही आमदार दटके यांनी सांगितले.
नाल्यातील भूखंडाला नासुप्रने दिले आरएल
शहराच्या काही भागात विकासकांनी नाल्यातही भूखंड पाडून विकले. विशेष म्हणजे नागपूर सुधार प्रन्यासने या भूखंडांना आऱएलही दिल्याची बाब बैठकीत पुढे आली. नासुप्रच्या कळमना भागातील ले-आऊटमध्ये रस्त्यांवर व वस्त्यांमध्ये पाणीच पाणी आहे. शहरातील एखही चेंबर चांगले नाही. त्यावर झाकणेही नाहीत, यावरूनही गडकरींनी नासुप्र, मनपा धारेवर धरले.
प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे
शहरातील ड्रेनेज लाइन जुनी आहे. यंदा पाऊस अधिक झाला, असे उडवाउडवीची उत्तरे देण्याच्या प्रयत्न प्रशासनाकडून झाला. यावेळी गडकरी चांगलेच संतापले. त्यांनी ज्या विभागाच्या मालकीचे रस्ते आहेत, त्या विभागाची पाटी रस्त्यांवर लावण्यात यावी. तसेच कंत्राटदाराचे नाव व नंबरही त्यावर देण्यात यावे असे निर्देश दिले.