मुंबईकरांचे डोकेदुखी वाढणार ! रविवारी एकाच दिवशी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडताना एकदा Timetable तपासाच
रविवारी मध्य रेल्वे हार्बर व पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांना प्रवासात विलंब होण्याची शक्यता आहे.

Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी रविवारी रेल्वे प्रवास पुन्हा एकदा डोकेदुखी ठरणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गांवर एकाच दिवशी मेगाब्लॉक घेण्यात आल्याने लोकल प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, या ब्लॉकदरम्यान ट्रॅक, सिग्नल आणि इतर तांत्रिक देखभाल केली जाणार असून, त्यामुळे काही गाड्या रद्द तर काहींना मोठा विलंब होणार आहे.
मध्य रेल्वेच्या काही लोकल रद्द, काही गाड्या वळवल्या
मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर विद्याविहार ते ठाणे दरम्यान हा ब्लॉक सकाळी 8 ते दुपारी 1.30 पर्यंत राहील. या वेळेत मेल-एक्स्प्रेस गाड्यांना जलद मार्गाकडे वळवण्यात येणार आहे. त्यामुळे 15 मेल-एक्स्प्रेस उशिराने धावतील. त्याचबरोबर काही जलद लोकल फेऱ्या रद्द होतील तर काहींना साधारण 20 मिनिटांचा विलंब होईल. प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करताना हा बदल लक्षात ठेवावा लागेल.
हार्बर मार्गावर काय स्थिती?
हार्बर मार्गावरही याच दिवशी ठाणे ते वाशी दरम्यान काम सुरू राहील. हा ब्लॉक सकाळी 11.10 वाजता सुरू होऊन दुपारी 4.10 वाजेपर्यंत चालणार आहे. या वेळेत ठाणे–वाशी–नेरुळ–पनवेल या मार्गावरील लोकल फेऱ्या पूर्णपणे बंद राहतील. मात्र हार्बर लाईनवरील इतर सर्व गाड्या नेहमीप्रमाणे धावतील.
पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना होणार विलंब
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान 5 तासांचा दिवसकालीन ब्लॉक घेण्यात आला . सकाळी 10.35 पासून दुपारी 3.35 पर्यंत या मार्गावरील धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवून चालवल्या जातील. त्यामुळे प्रवाशांना गर्दी आणि उशीराचा त्रास सहन करावा लागू शकतो.
कर्जत स्थानकावर 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पॉवर ब्लॉक
याशिवाय, कर्जत स्थानकावरही 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या काळात सिग्नल संबंधित महत्त्वाची यांत्रिक कामे केली जातील. त्यामुळे कल्याण ते खोपोलीदरम्यानच्या लोकल फेऱ्या पूर्णपणे रद्द राहतील. काही मेल-एक्सप्रेस गाड्या अंशतः रद्द होतील, तर काहींना मोठा विलंब होणार आहे.
27 ते 30 सप्टेंबरदरम्यान नागनाथ केबिन ते कर्जत (फलाट 2 व 3 दरम्यान) आणि कर्जत फलाट 3 ते चौक या मार्गावर दररोज सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 या वेळेत ब्लॉक राहील. या दरम्यान 12.20 वाजता सुटणारी सीएसएमटी–खोपोली लोकल कर्जतपर्यंतच चालवली जाईल. तसेच दुपारी 1.48 वाजता खोपोली–सीएसएमटी लोकल कर्जतहून सुरू होईल.
लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम
याचा परिणाम काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही होणार आहे. गाडी क्रमांक 22194 ग्वाल्हेर–दौंड रविवारी कल्याण–कर्जत मार्गे वळवली जाणार असून ती कल्याण येथे थांबेल. 30 सप्टेंबर रोजी कोइम्बतूर–एलटीटी (11014), चेन्नई–एलटीटी (12164) आणि आणखी एक गाडी (12264) प्रत्येकी 4 तास उशिराने धावणार आहे.थोडक्यात, या आठवड्याच्या शेवटी रेल्वे प्रवास करायचा असल्यास प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक आधीच तपासून मगच घराबाहेर पडावे, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
























