(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : मराठा आंदोलकांचं आवाहन, नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्रम पुढे ढकलला, मंत्री मुनगंटीवार यांचा दौरा रद्द
Nashik News : नाशिकच्या मराठा आंदोलकांच्या आवाहनानंतर सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
नाशिक : मराठा आरक्षणाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असून आता नाशिकमधील साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात झालं आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक वाचनालयाकडून कार्यक्षम पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्काराचे मानकरी भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार हे होते. मात्र मराठा आंदोलकांनी संबंधित कार्यक्रम पुढे ढकलावा असे आवाहन केल्यानंतर हा कार्यक्रम देखील पुढे ढकलण्यात आला आहे. तर यामुळे मुनगुंटीवारांचा दौराही रद्द करण्यात आला आहे.
राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून ठिकठिकाणी तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत असून ही संख्या वाढतच आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांचं देखील आमरण उपोषण सुरु असल्याने त्यांची देखील प्रकृती खालावत आहे. इकडं नाशिकमध्ये गेल्या 45 दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे, हे उपोषण आता आमरण उपोषणात रूपांतरित झाल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाकडून मंगळवारी विविध नेते मंत्र्यांचा कार्यक्षम पुरस्काराने सन्मान करण्यात येणार होता. हा कार्यक्रम सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन केल्यानंतर पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत सार्वजनिक वाचनालयाकडून रीतसर पत्रकही काढण्यात आल आहे.
दरम्यान सोशल मीडियावर सार्वजनिक वाचनालयाच्या सदर कार्यक्रमाचे पत्रक व्हायरल झाले होते. या पत्रकावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यास कार्यक्षम पुरस्काराने मंगळवारी गौरवणार असा मेसेज होता. हा मेसेज बघताच नाशिकला गेल्या 45 दिवसापासून अखंडित उपोषणात बसलेले उपोषणकर्त्यांनी याबाबत वाचनालयास जाब विचारला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यात कोट्यवधी गावानी सहभाग घेतला असून गाव खेड्यात शहरात मंत्री, नेत्यांना बंदी असतांना आपण मंत्र्याला का बोलवले असा सवाल केला. मराठा समाजाच्या उद्विग्नय भावना बघता आपण मंत्र्याला थांबवा, असा इशारा दिला. त्यांचा शब्द पाळत नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे सचिव डॉ धर्माजी बोडके यांच्या स्वाक्षरीने पत्रक काढून संबंधित कार्यक्रम पुढे ढकलला सांगण्यात आले आहे.
तहसीलदाराची गाडी फोडली...
जालना येथील आंदोलक देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तहसीलदार छाया पवार यांची गाडी फोडण्यात आली आहे. जालन्यातील रामनगर येथील ही घटना असल्याचे समोर येत आहे. बाजीउम्रद येथील मोबाईल टॉवरवर चढलेलेल्या आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत ही गाडी फोडण्यात आली आहे. तहसीलदार यांनी चर्चेसाठी गावात येण्याची गावकऱ्यांची मागणी होती. त्यानंतर रामनगर येथे आंदोलकांकडून रस्ता रोको देखील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आंदोलनस्थळा जवलून जाणाऱ्या तहसीलदारांची गाडी आडवून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलीय.
इतर महत्वाची बातमी :