SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
SA vs SL : दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. मार्को जेनसन याच्या भेदक गोलंदाजीपुढं श्रीलंकेचा डाव गडगडला.
South Africa vs Sri Lanka डरबन : श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जेनसन यानं श्रीलंकेच्या फलंदाजीला भेदक माऱ्याच्या जोरावर सुरुंग लावला. जेनसन यानं श्रीलंकेच्या 7 विकेट घेतल्या. यासाठी त्यानं केवळ 13 धावा दिल्या. विशेष बाब म्हणजे मार्को जेनसन याला पंजाब किंग्जनं आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये खरेदी केलं होतं.
मार्को जेनसन याच्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेनं गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 191 धावांवर बाद झाली होती. त्यानंतर श्रीलंकेचा संघ 42 धावात बाद झाला. श्रीलंकेनं केवळ 13 ओव्हर फलंदाजी केली. मार्को जेनसन यानं घातक गोलंदाजी केली. यामध्ये त्यानं 6.5 ओव्हरमध्ये केवळ 13 धावा देत 7 विकेट काढल्या.
मार्को जेनसनच्या माऱ्यापुढं श्रीलंकेचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. कमिंदू मेंडिस आणि लाहिरु कुमारा या दोघांना दोन अंकी धावसंख्या करता आली. कमिंदू मेंडिसनं 13 तर लाहिरु कुमारा यानं 10 धावा केल्या.
पहिल्या दिवशी पावसामुळं केवळ 20.4 ओव्हरचा खेळ झाला होता. दक्षिण आफ्रिकेनं 4 विकेटवर 80 धावा केल्या होत्या. आज दक्षिण आफ्रिकेच्या 6 विकेट पडल्या आणि त्यांचा डाव 191 धावांवर संपला. यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेला 42 धावा करता आल्या. श्रीलंकेची कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या ठरली. यामुळं दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावाच्या आधारावर 149 धावांची आघाडी मिळाली.
एकाच दिवशी 17 विकेट
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्या डावात 6 विकेट आणि दुसऱ्या डावात 1 विकेट दुसऱ्या दिवशी गमावली. तर, श्रीलंकेचा पूर्ण संघ 42 धावांवर बाद झाला. म्हणजे एका दिवसात 17 विकेट गोलंदाजांनी घेतल्या. या ग्राऊंडच्या खेळपट्टीवर फलंदाजांना फलंदाजी करणं अवघड असल्याचं यामुळं स्पष्ट होतंय.
श्रीलंकेच्या संघाचा यापूर्वीचा सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम 71 धावा होता. 1994 मध्ये ते पाकिस्तान विरुद्ध 71 धावांवर बाद झाले होते. त्यानंतर 2006 मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना श्रीलंका 73 धावांवर बाद झाली होती. तर, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनं 2013 मध्ये न्यूझीलंडला 45 धावांवर बाद केलं होतं.
मार्को जेनसनच्या कामगिरीमुळं पंजाबला आनंद
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये जेनसनला बेस प्राइस पेक्षा अधिक रक्कम मिळाली होती. त्याची बेस प्राईस 1.25 कोटी निश्चित करण्यात आली होती. पंजाबनं त्याला 7 कोटी रुपयांना खरेदी केलं. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स यांच्याशी स्पर्धा करत पंजाबनं बाजी मारली होती. जेनसन यापूर्वी सनरायजर्स हैदराबाद कडून खेळत होता. त्यानं 21 मॅचमध्ये 20 विकेट घेतल्या होत्या.
इतर बातम्या :