(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
Eknath Shinde On Sad Photo With Amit Shah: वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज आहेत का? याबाबतच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत.
Eknath Shinde On Sad Photo With Amit Shah: राज्याच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक झाली. अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. काल झालेल्या महाबैठकीतला एक फोटो समोर आला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या फोटोमध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, जेपी नड्डा, सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य असल्याचं दिसलं. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी दिसली. त्यामुळे वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज आहेत का? याबाबतच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. मात्र नाराज वगैरे काहीही नाही, मी खुश आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर दिली.
फोटोबाबतच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे काय म्हणाले?
अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांना फोटोबाबत प्रश्न विचारला. यावर मी कधी गंभीर, हसरा तुम्हीच ठरवता...मी आजही खुश आहे. आतापर्यंतच्या इतिहासात कधीही इतकं बहुमत मिळाले नव्हते, याचा अर्थ काय सरकारवर जनता खुश आहे. जनतेच्या आनंदातच आमचा आनंद आहे. नाराज वगैरे काहीही नाही. इतर कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद महत्त्वाचं असतं, असं एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान बैठकीत गंभीर असलेले एकनाथ शिंदे बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मात्र हसताना दिसले.
मी सगळ्यांची काळजी घेतोय- एकनाथ शिंदे
बैठक अतिश्य सकारात्मक झाली, पुन्हा उद्याही बैठक होईल. आमची भूमिका मी काल जाहीर केली. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मी कालच दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपला आहे. आता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय होईल. सगळं व्यवस्थित होईल. मी आता काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, मी सगळ्यांची काळजी घेतोय. लाडकी बहीण फेमस आहे, सख्खा लाडका भाऊ माझी नवीन ओळख निर्माण झाली आहे. सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे माझ्यासाठी. आजच्या बैठकीत साधकबाधक चर्चा झाली. उद्याही आमची बैठक होईल आणि दोन दिवसांत निर्णय होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.