माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
महेश सावंत यांना आज सकाळी अस्वस्थ वाटत असल्याने, त्यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन तपासणी केली. त्यावेळी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली
मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघातून राजपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा आणि शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांचा पराभव करणारे महेश सावंत जायंट किलर ठरले आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या निवडणुकांच्या रणधुमाळीत, धावपळीत त्यांनी स्वत:ला झोकून दिलं होतं. मात्र, निवडणुकीतील कामाचा ताण त्यांच्यावर पडल्याचं दिसून येत आहे. कारण, ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून ते सद्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. निवडणुकांच्या निलालानंतर मातोश्री बंगल्यावर जाऊन त्यांनी शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच, विजयाचा गुलालही उधळला होता. मात्र, नुकतेच त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थीर आहे.
महेश सावंत यांना आज सकाळी अस्वस्थ वाटत असल्याने, त्यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन तपासणी केली. त्यावेळी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. मात्र, अँजिओग्राफी केल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये एक ब्लॉकेज आढळून आल्याचे समोर आले. त्यानंतर, महेश सावंत यांना डॉक्टरांकडून अँजिओप्लास्टीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. लीलावती रुग्णालयात आजच त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत असून पुढील काही दिवस त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. तसेच, दोन ते तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशीही माहिती आहे.
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील तिरंगी लढतीत अत्यंत चुरशीची ठरलेल्या माहीम मतदारसंघात शिवसेना युबीटी पक्षाच्या ठाकरेंच्या महेश सावंत यांनी भगवा फडकवला. सावंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांचा पराभव केला. येथील मतदारसंघात अवघ्या 1316 मतांनी ते विजयी झाले आहेत. तर, सदा सरवणकर यांना येथील मतदारसंघात 48,897 मतं मिळाली. अमित ठाकरे यांनी 33,062 एवढी मतं घेतली. त्यामुळे, महेश सावंत यांच्याकडून राजपुत्राचा 17151 मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे, दोन दिग्गज उमेदवारांना पराभूत करुन महेश सावंत हे जायंट किलर ठरले आहेत. मात्र, ठाकरे गटाकडून येथील मतदारसंघात उमेदवार दिल्यामुळे राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून आपली खंत बोलून दाखवली होती. तसेच, आपण वरळी मतदारसंघातून उमेदवार दिला नव्हता, याची आठवणही त्यांनी करुन दिली होती.
हेही वाचा
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?