नाशिकमधील एका ग्राहकाने शीतपेयाची MRP पेक्षा अधिक किमतीने विक्री करणाऱ्या हॉटेलला शिकवला धडा
नाशिकमधील एका ग्राहकाने शीतपेयाची MRP पेक्षा अधिक किमतीने विक्री करणाऱ्या एका हॉटेलला चांगलाच धडा शिकवला आहे. सध्या नाशकात हा चर्चेचा विषय ठरतोय.
नाशिक : अनेकदा रेल्वे स्टेशन्सबाहेरील म्हणा किंवा महामार्गालगतच्या हॉटेल्समध्ये छापील किमतीपेक्षा अधिकचे पैसे ग्राहकांकडून आकारले जाऊन ग्राहकांची अक्षरशः लूट केली जाते. विशेष म्हणजे ग्राहकही याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, नाशिकमधील वैभव देशमुख या एका ग्राहकाने मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव परिसरात असलेल्या न्यू प्रताप हॉटेलला चांगलाच धडा शिकवलाय.
वैभव आपल्या कुटुंबासह 3 जानेवारीला संध्याकाळी या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते, भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी स्प्राईट हे शीतपेय घेतले. स्प्राईटमुळे त्यांची तहान तर भागली. मात्र, त्या शीतपेयावर छापील किंमत 40 रुपये असताना बिलात त्याची किंमत 55 रुपये एवढी लावण्यात आल्याने त्यांना चांगलाच शॉक बसला. वैभव देशमुख, ग्राहक (याबाबत हॉटेलच्या मॅनेजर आम्ही विचारणा केली असता आम्हाला कुलिंग चार्जेस द्यावा लागतो, सरकारला टॅक्स भरावा लागतो अशी उत्तरं त्यांनी दिली तसेच आम्ही अशाच दराने सगळ्यांना विक्री करतो. तुम्हाला कुठे तक्रार करायची तर करा, असंही त्यांनी सांगितलं)
वैभव यांनी संबंधित बिलाची रक्कम भरली तर खरी मात्र झालेली फसवणूक बघता न्याय मिळण्यासाठी थेट वैध मापनशास्त्र विभागाकडे त्यांनी मेलद्वारे संबंधित हॉटेल विरोधात तक्रार दाखल केली आणि या तक्रारीची दखल घेत वैध मापनशास्त्र विभागाने या हॉटेलमध्ये जाऊन सापळा रचला असता हॉटेलकडून छापील किमतीपेक्षा अधिक दराने शीतपेयाची विक्री होत असल्याचं समोर येताच न्यू प्रताप हॉटेल हॉटेलविरोधात त्यांनी वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 नूसार गुन्हा दाखल करत कारवाई केली असून पुढील तपास सध्या सुरु आहे.
या प्रकाराबाबत आम्ही हॉटेल प्रशासनाचीही बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असता मालक बाहेर गेले आहेत, असे कारण देत हॉटेल मॅनेजरने कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय. यासोबतच आम्हाला कुलिंग आणि ईतर खर्च येत असल्याने संबंधित ग्राहकाला आम्ही 40 रुपयांची बॉटल 55 रुपयांना विक्री करावी लागल्याचंही त्यांनी स्पष्ट केलय.
खरं तर छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने वस्तूची विक्री करणे हा एकप्रकारे गुन्हाच असला तरी मात्र अनेक ठिकाणी सर्रासपणे त्याची चढ्या दराने विक्री केली जाऊन ग्राहकाची लूट केली जाते. विशेष म्हणजे याकडे संबंधित सरकारी खात्याकडूनही कानाडोळा केला जातो. मात्र, ग्राहकांनो तुम्ही जर जागरूक राहिलात आणि होणाऱ्या फसवणुकीविरोधात वैभव प्रमाणे आवाज उठवला तर तुम्हाला न्याय नक्कीच मिळू शकतो हे नक्की.