(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Skin Disease : लम्पि आजाराचा नाशिक जिल्ह्यात शिरकाव, सिन्नरच्या दोन गावांत जनावरांना लागण
Lumpy Skin Disease : महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात गुरांना लंपी या आजाराची लागण झाली आहे. जनावरांमध्ये हा साथीचा आजार आल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
Lumpy Skin Disease : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ‘लंपी’ या विषाणुजन्य आजाराने शिरकाव केला आहे. सिन्नर तालुक्यातील मौजे पांगरी आणि दुसंगवाडी या गावांमध्ये जनावरांना ‘लंपी’ या विषाणुजन्य आजाराची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून बाधित क्षेत्रातील दहा किलोमीटर परिघातील परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात गुरांना लंपी या आजाराची लागण झाली आहे. जनावरांमध्ये हा साथीचा आजार आल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या आजाराचे लोन राज्यभर पसरत असून नाशिक जिल्ह्यातही या आजाराने एन्ट्री केली आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सिन्नरच्या दोन गावातील जनावरांना लंपी आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात सतर्कतेचे आवाहन करण्यात आले असून लसीकरणाला सूरवात झाली आहे.
आता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रुक व दुसंग वाडी या गावातील दोन शेतकऱ्यांच्या जनावरांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान 5 सप्टेंबर रोजी या जनावरांच्या नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यानंतर तीन दिवसांनी अहवाल आल्यानंतर तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या. यामध्ये संबंधित जनावरांना विलग केले, लसीकरणाला सुरवात केली.
सध्या नाशिक जिल्ह्यात दहा लाखांहून अधिक जनावरे असून लसीकरणाला सुरवात झाली आहे. शिवाय लम्पि आजाराची जनावरे आढळून आलेल्या सिन्नर तालुक्यातील दुसंगवाडी येथील 2000, तर पांगरी येथील ४००० जनावरांना लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या तात्पुरत्या स्वरूपात विकत घेत लसीकरण केले करण्यात येत असले तरी सिन्नर तालुक्यातील आठ हजार जनावरे असून आता साडे सात हजार लस घेतली असल्याचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
लम्पिच्या लक्षणांत घट
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लम्पि आजाराच्या लक्षणांत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील लम्पि आजाराच्या लाटेत जनावरांना पुरळ येणे, डोळ्यातून पाणी येणे, ताप येणे, भूक कमी होणे अशी लक्षणे दिसत होती. मात्र यंदा फक्त जनावरांच्या अंगावर पुरळ दिसून येत आहे. शिवाय जनावरांचे तापमानही कमी आहे. सध्या या आजाराच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी गोचीड फवारणी करणे, कडुनिंबाच्या पाल्याच्या धूर करणे आवश्यक असल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी दुबे यांनी सांगितले.
सिन्नर तालुक्याला पुराचा तडाखा
नैसर्गिक संकटाच्या समस्येच्या गर्तेत नेहमीच अडकून असलेला शेतकरी लंपीने आणखी अडचणीत आला आहे. सिन्नर तालुक्यात गेल्याच आठवडयात झालेल्या ढगफुटीने आधीच नागरिक तसेच शेतकरीही दुष्टचक्रात अडकलेला असतांना आता तालुक्यात लंपी आजाराने प्रवेश केल्याने शेतकरी व दुग्धव्यावसायिक या विषाणुजन्य आजारामुळे चिंतेत आहे. लंपीचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीची पावले उचलली आहेत. पशुपालक शेतकर्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकार्याकडून आवाहन
दरम्यान सिन्नर तालुक्यातील दोन जनावरांना लम्पि ची लागण झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जुंतुकीकरण करून 10 किलोमीटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन आयोजीत करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. तसेच बाधित क्षेत्रातील भोवतालची पाच किलोमीटर परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पशुसंवर्धन विभागाने बाधित भागात शीघ्र कृतीदल स्थापन करून साथीचा आजार नियंत्रणात आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या