Lumpy Skin Disease: जनावरांमध्ये लम्पी आजाराचा धोका वाढतोय, शेतकऱ्यांनो काय घ्याल काळजी?
Lumpy Skin Disease : कीटकांपासून होणाऱ्या लम्पी त्वचा रोग हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही.
Lumpy Skin Disease : कीटकांपासून होणाऱ्या लम्पी त्वचा रोग हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. ‘लम्पी स्कीन’ हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पण शेतकऱ्यांनी काळजी घेत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तसेच आपल्या जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावाराला लम्पी आजारा लागण होण्यापासून वाचविता येईल.
2020-21 मध्ये राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये, तसेच 2021-22 मध्ये 10 जिल्ह्यांत लम्पी त्वचा रोग प्रादुर्भाव आढळून आलेला होता. सध्या राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व दिल्ली या राज्यात पशुधनामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.
या आजाराची प्रमुख लक्षणे कोणती?
आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते.
लसिकाग्रंथीना सूज येते.
सुरवातीस ताप येतो.
दुधाचे प्रमाण कमी होते.
चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
हळूहळू डोके, मान, मायांग, कास इ. भागाच्या त्वचेवर 10-50 मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने येतात.
तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात.
डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.
राज्यात यंदा सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पी स्कीन डिसिज सदृष्य रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर राज्यामध्ये अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यामध्ये लम्पी त्वचा रोग प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण 71 गावांमध्ये लम्पी स्कीन रोग प्रादुर्भाव दिसून आला आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. जनावरामध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा. बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. तसेच गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. दरम्यान, या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी 8 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.