(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : पंचवटीतील 'हे' रस्ते पुढील तीन महिन्यांसाठी बंद; कारण काय? पर्यायी मार्ग कुठले?
Nashik News : पंचवटीतील दोन मार्ग तब्बल तीन महिन्यांसाठी सर्व वाहनांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या रस्त्यांच्या कामामुळे दोन रस्ते बंद केले आहेत.
Nashik News नाशिक : पंचवटीतील (Panchavati) सेवाकुंज ते गजानन चौक आणि नाशिक अमरधाम ते शिवाजी चौक दरम्यानचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी (Smart City) योजनेतंर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मल वाहिका आणि पावसाळी गटारींची कामे केली जाणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्मार्ट सिटी कंपनीने शहरातील उपरोक्त भागात पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत. वाहतुकीच्या नियमनासाठी ही कामे पूर्ण होईपर्यंत शहर वाहतूक शाखेने वाहतुकीत बदल केले आहेत. पंचवटीतील सेवाकुंज ते गजानन चौक (Sevakunj to Gajanan Chowk Road) आणि नाशिक अमरधाम ते शिवाजी चौक (Nashik Amardham to Shivaji Chowk) या रस्त्यांवर एकेरी बाजूने वाहतूक (Traffic) सुरु असेल.
दोन्ही मार्ग 'ना वाहनतळ क्षेत्र' म्हणून जाहीर
यासंबंधीची अधिसूचना पोलीस उपायुक्त (वाहतूक) चंद्रकांत खांडवी यांनी प्रसिध्द केली आहे. सेवाकुंज ते गजानन चौकापर्यंतचा रस्ता तसेच अमरधाम ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या दोन्ही मार्गांवर 'ना वाहनतळ क्षेत्र' (No Parking Zone) घोषित करण्यात आले आहे.
असे आहे वाहतुकीचे नियोजन
- अमरधाम ते शिवाजी चौकपर्यंतच्या बाजूकडील समांतर रस्त्याचा पर्यायी वापर करावा लागणार.
- सेवाकुंज ते गजानन चौक या मार्गावरील वाहतूक या रस्त्याच्या पूर्व बाजूकडील समांतर रस्त्यावरून होणार.
- रस्त्यावर वाहनांना एकेरी मार्गाने प्रवेश सुरू राहणार.
- सेवाकुंज ते गजानन चौक या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूस कामाच्या ठिकाणी नमूद मार्गावर ६० दिवसांसाठी सर्व प्रकारच्या वाहनांना ना वाहनतळ क्षेत्र जाहीर
- नाशिक अमरधाम ते शिवाजी चौक या रस्त्याच्या दुतर्फा ९० दिवसांकरीता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ना वाहनतळ क्षेत्र राहणार आहे.
- वाहनधारकांनी अधिसूचनेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
स्मार्ट सिटीला दिल्या 'या' सूचना
स्मार्ट सिटी कंपनी आणि ठेकेदाराने वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी उपरोक्त मार्गाच्या दोन्ही बाजूला लोखंडी जाळ्या लावणे, रात्री व दिवसा वाहनधारकांना दिसेल अशा प्रकारे प्रवेश बंद करणे. ना वाहनतळ क्षेत्राचे रेडिअम फलक व चालू-बंद होणारे दिवे (ब्लिंकर्स) लावणे बंधनकारक असल्याचेदेखील अधिसूचनेत म्हटले आहे. दोन्ही मार्गांवर ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कंपनी व कंत्राटदारावर राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.
आणखी वाचा