(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ayodhya Ram Mandir : फुलांची उधळण, श्रीरामाचा जयघोष...; नाशिकसह राज्यभरातील साधू-महंत अयोध्येला रवाना
Nashik News : अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. यानिमित्त गुरुवारी सकाळी नाशिकसह महाराष्ट्रातील साधू-महंत अयोध्येला रवाना झाले आहेत.
Ayodhya Ram Mandir नाशिक : अयोध्येत राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. देशासह जगभराचे लक्ष राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागलेले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील प्रमुख साधू-महंतांना निमंत्रण गेले आहे.
गुरुवारी सकाळी संकेश्वर व करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्यासह राज्यभरातील साधू-महंत अयोध्येकडे रवाना झाले आहेत. यावेळी साधू-महंतांवर फुलांचा वर्षाव करत श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. दोन दिवसांचा प्रवास करून साधू-महंत अयोध्येला पोहोचणार आहेत.
आमच्यासाठी भाग्याचा दिवस
रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. आमच्यासाठी हा एक भाग्याचा दिवस आहे. आम्ही दर्शनासाठी मोठ्या उत्सुकतेने जात आहोत. आमचा दोन दिवसांचा प्रवास आहे. दोन दिवसांनी आम्ही अयोध्येत पोहोचू. अयोध्येच्या भूमीला वंदन करू. आणि प्रभू रामाचे दर्शन घेऊ, अशा भावना यावेळी साधू महंतांनी व्यक्त केल्या.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणाला निमंत्रण?
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील सर्व मान्यवरांना निमंत्रण पत्रही पाठविण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6 हजारहून अधिक लोक या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा दिवस भारतात एखाद्या मोठ्या सणासारखा साजरा करण्यात येणार आहे. याच दिमाखादार सोहळ्याचं निमंत्रण पत्र आता समोर आलं आहे.
अयोध्येत (Ayodhya) रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात म्हटलं आहे की, मंदिराच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता प्रवेश करावा लागेल. कार्यक्रम किती तास चालेल? कार्यक्रमात कोणत्या गोष्टी आणणे बेकायदेशीर आहे? या सर्व गोष्टी निमंत्रण पत्रात लिहिलेल्या आहेत. तसेच 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत विशेष विधी होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध संप्रदायातील संतही उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
23 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांना घेता येणार दर्शन
अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी तीन दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नाही. मकर संक्रांतीनंतर 22 जानेवारीला रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. 20 आणि 21 जानेवारीला कोणत्याही भाविकांना प्रभू रामाचे दर्शन घेता येणार नाही. या दिवशी फक्त प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रित झालेल्यांना रामलल्लाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. 23 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांना भव्य राम मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. या काही दिवसांत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे संपूर्ण भारतातून रामलल्लाचे भाविक दर्शनासाठी हजेरी लावण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा