(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Teacher Graduate Constituency : सत्यजीत तांबे यांना टीडीएफचा जाहीर पाठिंबा!
नाशिक मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा वाढत असून दोनच दिवसांपूर्वी शिक्षक भारतीचा पाठिंबा मिळाल्यानंतर आता टीडीएफ या शिक्षक संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे.
Teacher Graduate Constituency : नाशिक मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा वाढत असून दोनच दिवसांपूर्वी शिक्षक भारतीचा पाठिंबा मिळाल्यानंतर आता टीडीएफ या शिक्षक संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची होणार यातील मात्र शंका नाही एकीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने जाहीर पाठिंबा जाहीर केल्यानंतर सत्यजीत तांबे हे देखील निवडणूक प्रचारावर जोर देत आहे दोनच दिवसांपूर्वी त्यांना शिक्षक भारती संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ने अधिकृत जाहिर पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ ) च्या राज्यकार्यकारणाची बैठक महाराष्ट्र हायस्कूल पुणे येथे राज्य अध्यक्ष विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेत झाली. या बैठकीला राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना टीडीएफ तर्फे उमेदवारीसाठी पुरस्कृत करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष विजय बहाळकर म्हणाले की, टीडीएफ संघटनेच्या पाठिंबावर मागील तीन वेळा आमदार डॉ. तांबे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. सर्व पदवीधर व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवताना त्यांनी मागील बारा वर्षात शिक्षकांचे व शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न प्राधान्याने सोडवले आहेत. याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदवीधर या सर्व मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे .शिक्षक आणि पदवीधर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. याचबरोबर अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील सर्व टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहेत.
आमदार डॉ.सुधीर तांबे व त्यांचा परिवार हा पुरोगामी विचार जपणारा असून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांना टीडीएफ पूर्ण पाठिंबा असल्याचेही विजय बहाळकर म्हणाले. तर हिरालाल पगडाल म्हणाले की, लोकशाही, समाजवाद, विज्ञान निष्ठा, धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी टीडीएफने सातत्याने काम केले असून सत्यजीत तांबे याच विचारांनी राज्यभर काम करत आहेत. म्हणून आगामी नाशिक पदवीधर मतदारसंघ च्या निवडणुकीत राज्यातील टीडीएफ एकमताने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे.
सत्यजीत तांबे यांना वाढता पाठिंबा...
एकीकडे नाशिक पदवीधर निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत वाढत आहे. ही निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सत्यजीत तांबे हे चर्चेत आहेत तर निवडणूक प्रचार देखील जोमात सुरू आहे. अशातच त्यांना मतदार संघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे दोनच दिवसांपूर्वी त्यांना शिक्षक भारती या संघटनेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर मस्ट या संघटनेने देखील पाठिंबा जाहीर केला होता तर आता टीडीएफ या संघटनेने देखील सत्यजीत तांबे यांना पाठिंबा जाहीर केल्याने तांबे यांचे बळ मतदारसंघात वाढत असल्याचे दिसून येत आहे.