(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिककरांनो आजच जास्त पाणी भरून ठेवा! शहरात उद्या पाणीपुरवठा बंद
Nashik News : गंगापूर धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती करावयाची असल्याने उद्या शनिवारी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
Nashik News नाशिक : गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती करावयाची असल्याने उद्या शनिवारी (दि.2) शहरात पाणीपुरवठा (Water Supply) बंद राहणार आहे. बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्र, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र, नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र येथून त्या-त्या भागात होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
नाशिक सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग व स्मार्ट सिटी (Smart City) कंपनीमार्फत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटर पाइपलाइनमधून कनेक्शन करणे तसेच ६०० मिमी व्यासाचे पवननगर रायझिंग मेनचे कनेक्शन जोडणी आदी कामे करण्याचे नियोजन आहे.
शनिवारी नाशिकमध्ये पाणीपुरवठा बंद
ही कामे करण्यासाठी गंगापूर डॅम पंपिंग स्टेशन येथील ओ साइडचे पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे. यामुळे गंगापूर डॅम पंपिंग स्टेशन येथून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात केला जाणारा पाणीपुरवठा बंद असेल. वरील जलशुद्धीकरण केंद्राप्रमाणेच विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र व शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर आणि नाशिकरोड या पाच जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पुरवठा होणार नाही. या पाच केंद्रातून ज्या भागात पाणी पुरवठा होतो, तिथे शनिवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यात बारा बंगला, पंचवटी, निलगिरी गांधीनगर आग, व नाशिकरोड परिसराचा समावेश आहे.
रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा
या भागात रविवारी सकाळी कमी दाबाने होईल. नागरिकांनी पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. अनेक भागात पाणी पुरवठा बंद राहणार असला तरी सातपूर, सिडको अशा काही भागात पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
नाशिकला फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा
नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या (Water Scarcity) झळा जाणवू लागल्या असून ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) धामधुमीत पाणी प्रश्न डोकं वर काढणार आहे. धरणातील पाणीसाठा दिवसागणिक कमी होत आहे. जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्याने कमी झालाय. आजचा उपयुक्त पाणीसाठा 40 टक्क्यांवर आला असून मागील वर्षी 63 टक्के होता.
इतर महत्वाच्या बातम्या
पाणी टंचाईचं भीषण वास्तव, नाशिकच्या गंगापूर धरणाच्या मधोमध उभं राहून आढावा