(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाणी टंचाईचं भीषण वास्तव, नाशिकच्या गंगापूर धरणाच्या मधोमध उभं राहून आढावा
Nashik Water Storage : नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारीतच टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पाणी प्रश्न डोकं वर काढणार आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा 44 टक्क्यांवर आला आहे.
Nashik Water Storage नाशिक : नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या (Water Scarcity) झळा जाणवू लागल्या असून ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) धामधुमीत पाणी प्रश्न डोकं वर काढणार आहे. धरणातील पाणीसाठा दिवसागणिक कमी होत आहे. जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्याने कमी झालाय. आजचा उपयुक्त पाणीसाठा 44 टक्क्यांवर आला असून मागील वर्षी 67 टक्के होता.
नाशिकच्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) आजमितीस 61 टक्के पाणी शिल्लक असून मागील वर्षी हाच साठा 74 टक्क होता, दारणा धरणात 43 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी 78 टक्के, पालखेडमध्ये 26 टक्के आजमितीला तर मागील वर्षी 51 टक्के होता. गिरणा धरणात 35 टक्के असून मागील वर्षी 56 टक्के पाणीसाठा शिल्लक होता तर मणिकपुंज धरणात अवघा 21 टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी 42 टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील 174 गाव आणि 385 वाड्याना 170 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे, ही संख्या पुढील महिन्यात वाढणार आहे.
नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार
नद्या कोरड्या पडू लागल्यात तर विहिरी तळ गाठू लागल्यानं सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. आजचा पाणीसाठा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पुरविण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे. जिल्ह्यातील गंगापूर सारख्या प्रमुख धरणातील पाणीसाठा हो मागील वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी कमी झाल्याने पाणी कपातीची टांगती तलवार नाशिककरांवर आहे.
559 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पाणी संभाव्य कपातीचा निर्णय घेणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातून टँकरची मागणी देखील वाढत असून 170 टँकरच्या माध्यमातून 559 गावं, वाड्या, वस्त्यांना पाणी पुरवठा केला जात असून टँकरची मागणी देखील वाढत आहे.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक-दोन दिवसात पाणी टंचाई आढावा बैठक
येत्या एक दोन दिवसात पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पाणी टंचाई आढावा बैठक घेतली जाणार आहे. मागील आठवड्यात पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला लोकप्रतिनिधी गैरहजर राहिल्याने पाणी टंचाई सारख्या गंभीर विषयावर बोलावलेली बैठक रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली होती. त्यामुळे येत्या बैठकीला आमदार खासदार उपस्थित राहणार का? हे बघणे ही महत्त्वाचे आहे.
सत्ताधारी सुवर्णमध्य कसा काढणार?
जून, जुलै महिन्यात सुरू होणारा पावसाळा लांबला तर ऐनवेळी पाणी कसे उपलब्ध करायचे या संदर्भात बैठकीत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी पाणी कपातीचा पर्याय प्रशासनासमोर आहे. मात्र, पाणी कपात केली तर नागरिकांचा रोष आणि विरोधकांना आयता मुद्दा मिळणार असल्यानं सुवर्णमध्य कसा काढायचा हा प्रश्न सत्ताधाऱ्यांसमोर आहे.
आणखी वाचा
Nashik News : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर, 437 गावांमध्ये पाणीबाणी, नागरिकांचे हाल