(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Deola : कुटुंबाची सर्वत्र शोधाशोध, मात्र चिमुरडा शेतातील खड्ड्यात बुडाला, एकुलत्या एक मुलाचा दुदैवी मृत्यू
Nashik News : शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून (Death) सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
नाशिक : एकीकडे लहान मुलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकदा अनुचित प्रकार घडल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मात्र तरीदेखील लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात आला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील देवळा तालुक्यातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून (Death) सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अलीकडच्या काळात आई वडील कामात व्यस्त असताना लहान मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. पालकांच्या व्यस्ततेमुळे मुलांकडे लक्ष दिले जात नसल्याने अनुचित प्रकार घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. दोन दिवसांपासून नाशिक (Nashik Rain) जिल्ह्यावर वरुणराजाने कृपादृष्टी केली आहे. सर्वदूर पाणीच पाणी दिसत, नदी नाल्यांना पूर आला आहे. पावसाने आजूबाजूचे खड्डे पाण्याने भरले आहेत. याच खड्ड्यात पडून देवळा (Deola) तालुक्यातील खामखेडा येथील सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. केदा रवींद्र नामदास असे चिमुकल्याचे नाव आहे. तो इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होता. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मेंढपाळ व्यवसायानिमित्त नामदास कुटुंबीय खामखेडा गावात स्थायिक झाले होते. नामदास कुटुंबीय खामखेडासह परिसरात मेंढीपालन करून उदरनिर्वाह करत होते. गेल्या तीन महिन्यांपासून मांगबारी घाटातील नवश्या गणपती परिसरात तात्पुरता स्वरूपात पाल मांडून राहत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे जंगलामध्ये मेंढ्या चारून घरी परतल्यानंतर दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान नामदास कुटुंबिय वाड्यावरील मेंढ्या आवरत असतांना रविंद्र पंडित नामदास यांचा सहा वर्षीय चिमुकला केदा हा बराच वेळ न दिसल्याने त्याच्या कुटुंबीयांना त्याची आजूबाजुच्या परिसरात शोधाशोध केली. मात्र तो कुठेच आढळून येत नव्हता. अखेर गावाजवळच असलेल्या शेतामध्ये असलेल्या खड्ड्याच्या पाण्यात आढळून आला. त्यानंतर तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु उपचारापूर्वीचं डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या बातमीने आई- वडिलांसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला. एकुलत्या एक चिमुकल्याच्या मृत्यूने खामखेड्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लहान मुलांकडे लक्ष देणं महत्वाचं
एकीकडे सध्या सर्वांचंच आयुष्य धावपळीचं झालं आहे. अनेकजण नोकरी, व्यवसाय सांभाळत असल्याने अनेकदा लहान मुलांकडे दुर्लक्ष होते. या माध्यमातून अशा घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे लहान मुले खेळण्याच्या बहाण्याने कोणत्याही वस्तूला पटकन हातात घेत असतात, कधी एखादी धारदार वस्तू हातात घेऊन खेळत असतात. तर कधी रस्त्यावर, बाहेर जाऊन खेळात असतात. अशावेळी अनुचित प्रकार घडण्याची संभावना असते. अशा घटना वारंवार घडत असल्याने पालकांनी वेळीच या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिसते.