(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Accident : खड्डा चुकवण्याचा नादात दुचाकी स्लिप झाली; थेट आयशरखाली सापडली, दुचाकीचालकाचा मृत्यू
Nashik News : नाशिक शहरात (Nashik) अपघातांचे प्रमाण वाढत असून खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असल्याचे समोर आले आहे.
नाशिक : नाशिक शहरात (Nashik) अपघातांचे प्रमाण वाढत असून खड्ड्यांमुळे अनेक अपघात (Nashik Accident) होत असल्याचे देखील समोर आले आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरातील सातपूर अंबड लिंकरोडवर घडली आहे. हा अपघात जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.
नाशिक शहरात अनेक भागात खड्ड्यांचे (Potholes) साम्राज्य असून अनेकदा वाहने स्लिप होण्याचे, खड्डा चुकवण्याच्या नादात अपघात होत आहे. असाच अपघात सातपूर अंबड लिंकरोड परिसरात घडला आहे. सातपूर परिसरात राहणारे राजकुमार सिंह हे आज सकाळी आपल्या दुचाकीवरुन खाजगी कंपनीत कामावर जात असतांनाच रस्त्यावर पडलेला खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून हा अपघात महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे झाल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. यंदा नाशिकमध्ये समाधानकारक पावसाने हजेरी लावली नसतांना अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीत (Satpur MIDC) नोकरीला दुचाकीने जाणाऱ्या कामगाराला भरधाव आयशर ट्रकने पाठीमागून कट मारल्याने ट्रकच्या चाकाखाली सापडून कामगार जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. दुचाकीचालक राजकुमार सिंग अंबड एमआयडीसीतील टेक्नोक्राफ्ट कंपनीत कामावर जात होते. यावेळी विराट संकुल ते संजीवनगरच्या मध्यभागी लिंक रोडवरील खड्डा चुकवताना त्यांची दुचाकी घसरुन थेट आयशर वाहनाच्या खाली आली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस (Ambad Police) घटनास्थळी दाखल झाले होते. अंबड लिंक रोडवर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे ही बाब उघडकीस आली.
नागरिकांकडून संताप
दुचाकीवरुन जात असताना अचानक रस्त्यात खड्डा आला, हा खड्डा चुकवण्याच्या नादात गाडी बाजूने घेत असताना स्लिप झाली. ती थेट त्याच बाजूने जाणाऱ्या आयशरच्या चाकाखाली आली. यात दुचाकीचालकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. ते सातपूरकडून औद्योगिक वसाहतीत दुचाकीने सकाळी पावणेआठ वाजता नेहमीप्रमाणे कामावर जात असताना ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मनपाच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र निषेध करत नागरिकांनी रस्त्यावर येत आंदोलन केले. यापूर्वीच जर अंबड-लिंकरोडवरील संजीवनगर भागात खड्डे बुजवले असते, तर कदाचित ही दुर्घटना टळली असती तसेच या अपघाताला मनपा प्रशासन कारणीभूत असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे कामगाराला जीवाला मुकावे लागले, अशा प्रतिक्रिया निवृत्ती इंगोले यांच्यासह नागरिकांनी दिल्या.
मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू
दुसऱ्या घटनेत त्र्यंबकेश्वर रोडवरील सातपूर पोलीस ठाण्याजवळ चारचाकी दुभाजकाला धडकल्याने महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. याबाबत सातपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. महापालिकेच्या सातपूर विभागात अतिक्रमण विभागात कार्यरत मयूर काळे कारने सिडको येथील मटाले मंगल कार्यालय परिसरातील आपल्या घरी जात होते. त्यादरम्यान त्यांची कार सातपूर पोलीस ठाण्याजवळ दुभाजकाला धडकली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
इतर महत्वाची बातमी :