Nashik Bus Accident : देवीचं बोलावणं आलं, मुडी गावातून चौदा महिला गडावर दर्शनासाठी आल्या, मात्र जाताना तेराच गेल्या....
Amlaner : अमळनेर तालुक्यातील मुडी येथील 14 महिला वणी गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी एकत्र गेल्या होत्या.
Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी गडावरून (Saptashrungi Gad) एसटी बस दरीत कोसळली या अपघातात अमळनेर (Amalner) मुडी येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. याच गावातील 13 प्रवासी जखमी झाले आहेत. सप्तशृंगी गडावर बस खाली कोसळून झालेल्या अपघातात अमळनेर तालुक्यातील मुडी येथील महिला आशाबाई राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकास एसटी महामंडळाकडून 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.
आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास सप्तशृंगी घाटात (Saptashurngi Gad) एसटी बसचा मोठा अपघात (Bus Accident) झाल्याची घटना घडली. सप्तशृंगी घाटातील गणपती पॉईंटजवळ बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून 18 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील चार जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अन्य अकरा महिलांसह 2 पुरुषांना नाशिकच्या (Nashik) शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी अमळनेर तालुक्यातील मुडी येथील एकूण 14 महिला या नाशिक येथील वणी गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी एकत्र गेल्या होत्या. यादरम्यान सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या या बसला अपघात झाला. सप्तशृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळली. या मुडी येथील महिला भाविक आशाबाई राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या सोबतच्या महिला ह्या जखमी झाल्या आहेत.
या बसमध्ये मूडी प्र. डांगरी येथील 14 प्रवासी होते. त्यातील आशाबाई राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला असून मूडी येथील प्रमिलाबाई गुलाबराव बडगुजर, संजय बळीराम भोई, सुशिलाबाई सोनू बडगुजर, वच्छलाबाई साहेबराव पाटील, सुशीलाबाई बबन नाजन, विमलबाई भोई, प्रतिभा संजय भोई, जिजाबाई साहेबराव पाटील, संगीता मंगुलाल भोई, रत्नाबाई, सुरेखाबाई हिरालाल बडगुजर, संगीता बाबूलाल भोई, भारगोबाई माधवराव पाटील हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मुडी येथील महिलेचे नातेवाईक तसेच इतर ग्रामस्थ नाशिककडे रवाना झाले आहेत.
कसा झाला अपघात?
दरम्यान अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची होती. काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरु झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरुन खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात होऊन बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अठरा प्रवाशी जखमी आहेत. तर सर्वाधिक जखमी प्रवाशी हे अमळनेर तालुक्यातील मुडी येथील आहेत. जखमींवर शासनाच्या माध्यमातून उपचार केले जातील तर मृत महिलेला एसटी महामंडळाकडून दहा लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा