Nashik Accident : आयुष्याचा टर्निंग पॉंईंट, अन्... नाशिकच्या देशमुख कुटुंबातील एकुलत्या एक मुलावर काळाचा घाला
Nashik News : एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूने सातपूर परिसरातील देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिक : नाशिकसह परिसरात सातत्याने अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये वाढ होत असून रोज शहरातील वर्दळीच्या ठिकाणी अपघात होत आहेत. यात तरुणाच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र आहे. अशातच नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील आयटीआय सिग्नलजवळ दुचाकी बस अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिक- त्र्यंबकेश्वर (Nashik Trimbakeshwer) या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. एमआयडीसीचा भाग असल्याने लहान वाहनापासून मोठ्या वाहनापर्यत रस्त्यावर धावत असतात. अनेकदा या मार्गावरील सिग्नल यंत्रणा बंद असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. अशातच वाहनधारक पुढे मागे न पाहता थेट वाहन दामटत असतात. अशावेळी अपघाताच्या (Nashik Accident) घटना घडत असतात. नाशिक- त्र्यंबकेश्वर मार्गावरील रस्त्यावर आयटीआयजवळ खासगी बस आणि दुचाकी यांची शनिवारी दुपारी समोरासमोर झालेल्या धडक झाली. यात 28 वर्षीय वैभव मच्छिंद्र देशमुख (Vaibhav Deshmukh) हा दुचाकीचालक जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने सातपूर पोलिसांनी (Satpur Police) घटनास्थळ गाठून बसचालकाला ताब्यात घेतले आहे.
सातपूर परिसरात राहणारा वैभव हा मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून एका कंपनीत नोकरी करत होता. वैभव शनिवारी दुपारी सातपूरकडे जात असताना याचवेळी आयटीआय सिग्नलजवळ अचानकपणे खासगी बसने धोकादायकरीत्या वळण घेतले. यावेळी चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने बसची जोरदार धडक वैभवच्या दुचाकीला बसली आणि तो खाली कोसळला. वैभवच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यांनतर सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित बसचालकास ताब्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई वडिलांवर दुःखाचा डोंगर
दरम्यान वैभव हा देशमुख कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या बहिणीचे लग्न झालेले आहे. त्याचे वडील मालवाहतूक करणारी गाडी छोटा हत्ती गाडी चालवतात. मध्यमवर्गीय कुटुंबातील वैभव याने उच्च शिक्षण घेत नोकरी मिळविली होती. प्रतिकूल परिस्थिती असतानाही आई- वडिलांनी कष्टाने त्याला शिकविले. त्यामुळे कुटुंबाचा तो मोठा आधार होता. मात्र त्याच्या अशा जाण्याने देशमुख कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून श्रमिकनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच आई- वडिलांनी हंबरडा फोडला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अपघात झाल्यानंतर अपघात स्थळी युवकाच्या डोक्यात हेल्मेट असते तरी युवकाचे प्राण वाचले असते अशी चर्चा सुरू होती. पोलिसांकडून वारंवार दुचाकी चालकांना हेल्मेट परिधान करण्याचे आव्हान केले जात असते तसेच हेल्मेट न घालणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई केली जाते असे असताना देखील अनेक नागरिक विना हेल्मेट दुचाकी चालवत असतात. अपघातात मृत्यू झालेल्या वैभवाच्या स्पोर्ट बाईकचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.