(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : संजय राऊत शिवसैनिकांसोबत वन टू वनसाठी नाशिक दौऱ्यावर, शहरात मेळावा, तर नांदगावला विशेष दौरा
Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) शिवसैनिकांसोबत वन टू वनसाठी नाशिक दौऱ्यावर आले आहेत.
Sanjay Raut : शिवसेनेचे नेते तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असून नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी विशेष संवाद मेळावा (Samvad Melava) आयोजित करण्यात आला आहहे. या माध्यमातून शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांशी ते वन टू वन चर्चा करणार आहेत. त्यामुळे संजय राऊत यांचा आजचा दौरा महत्वाचा ठरणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या ठाकरे गोटात चाललेली अंतर्गत खळबळ, शिंदे गटात (Shinde sena) जाणाऱ्यांची चर्चा यामुळे ठाकरे गट अस्वस्थ आहे. अशातच नाशिक शिवसेनेला उभारी देण्यासाठी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिक (Nashik) शहराच्या पदाधिकऱ्यांमध्ये प्राण फुंकण्यासाठी संजय राऊत नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या ठाकरे गटाला उर्जितावस्था मिळणार यात शंका नाही. शिवाय गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातले काही पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. या पदाधिकाऱ्यांशी संजय राऊत स्वतः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी वन टू वन चर्चेसह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक शिवसेनेच्या शिंदे गटातील काही नगरसेवक, पदाधिकारी हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देताना शिवसेना गोटात अस्वस्थता निर्माण करण्यात येत असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत सोक्ष मोक्ष लावण्यासाठी संजय राऊत स्वतः याबाबत चर्चा करणार आहेत. त्यासाठी एका दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. आज दिवसभर पदाधिकाऱ्यांशी तसेच माजी नगरसेवकांची वन टू वन चर्चा करून त्यांच्या नेमकी अडचणी जाणून घेणार आहेत. त्यानंतर आज सायंकाळी ते मेळावा घेऊन शिंदे गटाचा चांगला समाचार घेणार आहेत.
असे आहेत कार्यक्रम
आज सकाळी दहा ते साडेबारापर्यंत नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक यांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातील गणेश धात्रक यांच्या संपर्क कार्यालयाचे भेट देणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पाच वयाच्या सुमारास नाशिक शहरातील शिवसेना कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.