Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Dhule Crime News : विविध कॉल्स आणि मेसेज यांची तपासणी केल्यानंतर अखेर तब्बल अकरा दिवसानंतर मृत प्रवीण सिंह गिरासेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे : शहरातील (Dhule Crime News) प्रमोदनगर (Pramodnagar) भागात राहणाऱ्या प्रवीण सिंग गिरासे कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांकडून गेल्या पंधरा दिवसांपासून तपास सुरू होता. यात त्यांच्या कुटुंबांचे देखील जबाब नोंदविण्यात आले होते. तसेच प्रवीण सिंग गिरासे यांना आलेले विविध कॉल्स आणि मेसेज यांची तपासणी केल्यानंतर अखेर तब्बल अकरा दिवसानंतर मृत प्रवीण सिंह गिरासे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवीण गिरासे यांचे फर्टिलायझरचे दुकान होते. ते पत्नी आणि दोन मुलांसमवेत धुळ्यातील प्रमोदनगर येथे वास्तव्यास होते. आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले होते. मात्र, त्यांच्या घराचा दरवाजा काही दिवसांपासून बंद असल्याचे नागरिकांना दिसत होते. प्रवीण गिरासे यांची बहीण त्यांना भेटण्यासाठी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा वरच्यावर लावण्यात आला होता. तो त्यांनी उघडला असता संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचे प्राथमिक निदर्शनास आले होते.
घातपात असल्याचा पोलिसांना होता संशय
प्रवीण गिरासे हे घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले होते. त्यांची पत्नी दीपांजली, मुलगा मितेश वसोहम मृतावस्थेत आढळले होते. मृत प्रवीण सिंह गिरासे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रथमदर्शनी पोलिसांना हा घातपात असल्याचा संशय आला होता.
मृत प्रवीण गिरासेंवर खुनाचा गुन्हा दाखल
यावरून पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर तसेच प्राप्त झालेल्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर प्रवीण सिंह गिरासे यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले यांचा मृत्यू हा विष प्रयोगाने झाला नसून एकाच दोरखंडाने गळफास देऊन झाल्याचा अहवाल समोर आला आहे. घटनेच्या चौकशी अंति प्रवीण सिंह गिरासे यांच्यावरच खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता घटनेच्या तपासाला आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, मृत प्रवीणसिंग गिरासे याच्या विरोधात मरणोत्तर गुन्हा दाखल झाला आहे.
आणखी वाचा
तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील खळबळजनक घटना