'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
Baramati Crime News : बारामती शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भंगार व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्यात आले आहे.
बारामती : पोलीस (Police) असल्याची बतावणी करत एका भंगार व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार बारामती (Baramati Crime News) शहरात घडला आहे. या प्रकरणी टोळीतील सहाजणांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. बारामती तालुका व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईत 2 गावठी पिस्तुलासह 2 लाख 51 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
संतोष लक्ष्मण भंडलकर (42, रा. पणदरे, बारामती), सुरेश अशोक राखपसरे (33, रा कुंजीर वस्ती, मांजरी), शेखर सुभाष शिंदे (रा. सांगवी, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. सूरज शंकर मदने (रा. माळेगाव, बारामती), हरीभाउ बबन खुडे, अशोक गणपती बनसोड (दोघेही रा. मांजरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कुतुबुद्दीन सुभेदार शाह (40, रा. तांदुळवाडी, बारामती) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
भंगार व्यावसायिकाचे अपहरण
फिर्यादी कुतुबुद्दीन सुभेदार शाह यांचे वंजारवाडीत भंगार खरेदी-विक्रीचे दुकान आहे. तेथून 23 सप्टेंबरला त्यांचे अपहरण करण्यात आले होते. ते दुकानावर असताना चार अनोळखी लोक आय-20 कार विक्रीसाठी घेवून आले. ही कार विक्री करायची असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कारला नंबर प्लेट नसल्याने फिर्यादीने त्यांना नकार दिला.
15 लाख रुपये दे नाही तर...
त्यानंतर आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांना कारमध्ये बळजबरी बसवले. त्यांच्या जवळील मोबाईल व आठ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. तु चोरीचा माल खरेदी केला आहे. 15 लाख रुपये दे नाही तर तुला भिगवण पोलीस स्टेशनला घेवून जावू असे सांगितले. फिर्यादीने आरडाओरडा केल्यावर एकाने पिस्तुलाचा धाक दाखवला.
तीन जणांना ठोकल्या बेड्या
त्यांना दौंड-नगर रोडने चिखली गावाजवळील एका पेट्रोलपंपावर सोडून देण्यात आले. याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहितीनुसार ही कार संतोष भंडलकर वापरत असल्याचे समजले. त्यानुसार तो साथीदारांसह सोलापूर बाजूकडे जात असताना हिंगणगाव येथे त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Crime: क्यूआर कोड स्कॅन दाखवायचा पण पैसे कधी पोहोचलेच नाहीत, कॅबचालकानं फोनपेमार्फत केली अशी फसवणूक