(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik APMC Election : भुजबळांची सरशी, भुसेंना जोरदार धक्का, तर पिंपळगावमध्ये तुफान राडा, काय घडलं आतापर्यंत?
Nashik APMC Election : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील सात बाजार समित्यांचा निकाल जाहीर होत असताना काही धक्कादायक निकाल हाती आले आहेत.
Nashik APMC Election : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील सात बाजार समित्यांचा निकाल जाहीर होत असताना काही धक्कादायक निकाल हाती आले आहेत. येवला बाजार समितीमध्ये छगन भुजबळांच्या गटाने विजय मिळवला आहे. दुसरीकडे मालेगावात (Malegaon) दादा भुसेंना अद्वय हिरे धक्का देण्याच्या तयारीत आहेत. पिंपळगाव बाजार समिती (APMC Election) निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
आज नाशिक जिल्ह्यातील सात बाजार समिती (Nashik Bajar Samiti) निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यातच हळूहळू निकाल हाती येत आहेत. त्यानुसार अनेक बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. छगन भुजबळ यांना प्रतिष्ठेची असलेली येवला बाजार समितीत एका हाती सत्ता मिळवली आहे. दराडे गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. अठरा पैकी पंधरा जागांवर भुजबळ गटाने विजय मिळवला आहे.
येवल्यात भुजबळांची सरशी
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) साहेब यांचे वर्चस्व दिसून आले आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 13 जागा मिळवीत दोन अपक्षांसह एकूण 15 जागांवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर आमदार दराडे गटाला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. येवला विधानसभा मतदारसंघात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली आहे.
मालेगाव बाजार समितीत दादा भुसेंना धक्का
नाशिक जिल्ह्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी मालेगाव बाजार समिती निवडणुकीत अद्वय हिरे गटाने सरशी घेतली आहे. त्यामुळे दादा भुसे (Dada Bhuse) गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. मालेगाव बाजार समितीत सोसायटी गटाच्या 11 जागांची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून यात 11 पैकी 10 जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या महाविकास आघाडी प्रणीत कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलला मिळत आहेत. दरम्यान मागील 20 वर्षांपासून बाजार समितीवर पालकमंत्री भुसे यांच्या समर्थकांची सत्ता आहे. सोसायटी गटाचा कल लक्षात घेता अद्वय हिरे पालकमंत्री दादा भूसेंना धक्का दिला आहे. यावेळी हिरे समर्थकांकडून जल्लोष करण्यात येऊन 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. सद्यस्थितीत ग्रामपंचायत गट, व्यापारी व हमाल मापारी गटाच्या 7 जागांचे निकाल अजून बाकी आहेत.
मतमोजणी दरम्यान गोंधळ
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत फेर मत मोजणीच्या मुद्द्यावरून अपक्ष उमेदवार यतीन कदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. माजी आमदार अनिल कदम यांचे स्वीय सहायक नितीन निकम यांच्यावर यतीन कदम धावून गेल्याने हमरीतुमरीवर गोष्ट आली. त्यामुळे मतमोजणी केंद्रात काही काळ गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बंदोबस्तवरील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.