Nashik APMC Election : लासलगाव बाजार समितीत पती-पत्नीचा विजयी गुलाल, पत्नीला 412 तर पतीला 303 मते
Nashik APMC Election : लासलगाव बाजार समितीत निवडणुकीत माजी सभापती सुवर्णा जगताप आणि त्यांचे पती हे दोघेही निवडून आले आहेत.
Nashik APMC Election : एकीकडे येवला बाजार समिती (Yeola Bajar samiti) निवडणुकीत छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) नेतृत्वाखालील पॅनलने एकहाती विजय मिळवला. मात्र लासलगाव बाजार समितीमध्ये भुजबळांना धक्का बसला असून आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे शेतकरी पॅनलमधील जगताप पती-पत्नी लासलगाव बाजार समितीवर निवडून आले आहेत.
सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्ह्णून ओळख असलेली लासलगाव बाजार समिती (Lasalgaon Bajar Samiti) निवडणुकीचा निकाल लागला असून छगन भुजबळ यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीत छगन भुजबळ आणि जयदत्त होळकर प्रणित शेतकरी विकास पॅनल आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी संचालक डी के जगताप यांच्या नेत्तृत्वाखाली शेतकरी पॅनलमध्ये सरळ लढत होती. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थोरे गटाला 18 पैकी 9 तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि जयदत्त होळकर यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनलला 8 तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. या 18 जागांमध्ये 10 जुने पुन्हा विजयी झाले असून बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप व त्यांचे पती हे दोघेही निवडून आले आहेत.
लासलगावं बाजार समितीमध्ये (Nashik APMC Election) शेतकरी पॅनलकडून माजी सभापती सुवर्णा जगताप आणि त्यांचे पती ज्ञानेश्वर किशन जगताप हे उमेदवार होते. हे दोघेही निवडून आल्याने त्यांची लासलगाव बाजार समितीच्या संचालकपदी वर्णी लागली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोसायटी गटातून सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप या उमेदवारी करत होत्या तर त्यांचे पती ज्ञानेश्वर किशन जगताप हे ग्रामपंचायत गटामधून निवडणूक लढवत होते. आज लागलेल्या निकालात दोघांनीही विजय मिळवला आहे. यात माजी सभापती सुवर्णा जगताप यांना 412 मते तर डीके जगताप यांना 303 मते मिळाली आहेत.
असे आहेत विजयी उमेदवार
हमाल गटातून रमेश पालवे, ग्रामपंचायत - सर्वसाधारण गटातून जगताप डिके, थोरे पंढरीनाथ, आर्थिक दुर्बल गटातून बोरगुडे, अनुसूचित जाती गटातून महेश पठाडे, व्यापारी गटातून प्रवीण कदम, तर बाळासाहेब दराडे हे चिठ्ठीद्वारे विजयी झाले आहेत. सोसायटी मतदार गटातून तानाजी आंधळे, इतर मागास प्रवर्ग गटातून श्रीकांत आवारे तर महिला राखीवमधून सोनिया होळकर, सुवर्णा जगताप विजयी झाल्या आहेत. इतर विजयी उमेदवारांमध्ये काळे भीमराज निवृत्ती, जाधव छबुराव सदाशिव, डोखळे राजेंद्र सदाशिव, डोमाडे गणेश वाल्मिक, दरेकर संदीप पुंडलिक, होळकर जयदत्त सीताराम, क्षिरसागर बाळासाहेब रामनाथ हे उमेदवार विजयी झाले आहेत.