(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
पुणे ड्रग्ज आणि पब प्रकरणावरुन राजकीय गरमागरमी झालेली दिसून येत आहे. त्यातच, माझ्या काळात असं घडलं नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सध्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट दाखवले होते.
मुंबई : पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण तापलं असून मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यातील ड्रग्ज आणि पब संस्कृतीसंदर्भात केलेल्या विधानावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं दिसून येत आहे. मी पालकमंत्री असताना पुण्यात असं घडलं नव्हतं, असे म्हणत सध्याच्या पालकमंत्र्यांकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवले. त्यावरुन, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पलटवार केला आहे. अमोल मिटकरींनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मिटकरींच्या या आरोपावर आता भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी यांनी परखड प्रतिक्रिया दिली. अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालण्याची गरज असल्याचं दरेकर यांनी म्हटलं. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आधीच महायुतीत असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.
पुणे ड्रग्ज आणि पब प्रकरणावरुन राजकीय गरमागरमी झालेली दिसून येत आहे. त्यातच, माझ्या काळात असं घडलं नाही, असे म्हणत पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सध्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट दाखवले होते. त्यावरुन, आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यात अमोल मिटकरींनी चंद्रकात पाटील यांच्यावर गभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, असे म्हटले आहे. त्यामुळे, महायुतीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
''अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे, पक्षाने पाहावे त्यांना काय अधिकार आहेत. नेहमी बाष्पळ बडबड असते असे म्हणत मागच्या एका प्रकरणाचा दाखलही प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांना समज देण्याची गरज आहे, महायुतीत तडा जाणार नाही, असे वक्तव्य त्यांनी करू नये.आपण बोलून जाता ते महायुतीला हानिकारक आहे, प्रदेशाध्यक्षांनी त्यांना याबाबत सांगावे,'' असे आवाहनही दरेकर यांनी सुनिल तटकरेंना उद्देशून केले आहे.
रोहित पवारांना देवेंद्रद्वेषाची कावीळ
आमदार रोहित पवार यांच्याकडून गृहंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेलाही दरेकरांनी उत्तर दिलंय. सकाळ, दुपार, संध्याकाळ देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याशिवाय रोहित पवार यांचा दिवस जात नाही. फडणवीसांच्या नेतृत्वाचा दरारा आहे, त्यांच्या भीतीपोटीच त्यांना टार्गेट केले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताकदीने काम करणार आहोत. त्यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता, तुमच्या मागणीवर ते राजीनामा देणार नाहीत. रोहित पवारांना देवेंद्र द्वेषाची कावीळ त्यांना झाली आहे, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी रोहित पवारांवर पलटवार केला आहे. दरम्यान, शेतकरी कर्ममाफीवर बोलताना, सरकारची भूमिका मुख्यमंत्री जाहीर करतील, पण शेतकऱ्यांना जेवढे देता येईल, तेवढे देण्याची आमची भूमिका आहे, असे दरेकर यांनी म्हटले.
अमरावती कार्यालयासंदर्भातही मांडली भूमिका
कुणीही कायदा हातात देण्याची गरज नाही, एकच कक्ष होता आधी बोंडे खासदार होते, त्यानंतर दुसरे खासदार झाले आहेत. दुसऱ्या कक्षासंदर्भात निर्णय होण्याचे बाकी आहे. त्यामुळे कुठल्याही मुद्द्याचे ते राजकारण करू पाहत आहेत, असे म्हणत काँग्रेस नेत्यांवर दरेकर यांनी टीका केली.