पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या युवकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : लोकसभा निवडणुकीतील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत बीडमध्ये पंकजा मुंडेंचा (Pankaja munde) 6 हजार मतांनी पराभव झाला. बीड जिल्ह्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडेंनी जिल्ह्याचं प्रतिनिधित्वाची धुरा सांभाळली. त्यामुळे, साहजिकच पंकजा यांचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण, यंदा प्रथमच बीड (Beed) जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत जातीय रंग पाहायला मिळाला.जातीय तेढ निर्माण झाल्यानेच पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. त्यातच, पराभवानंतर मुंडेंच्या समर्थकांनी मोठी निराशा व्यक्त केली. जिल्ह्यात काही ठिकाणी आत्महत्येच्याही घटना घडल्या आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. काही, तालुक्यात बंदही पुकारण्यात आला. आता, परभणी पोलिसांनी (Police) पंकजा मुंडेंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाला अटक केली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या युवकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध परळीत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता सदरील युवकाला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले. आता, संबंधित युवकाला परळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. सदरील आरोपीने इन्स्टाग्रामवर पंकजा मुंडे यांच्याविषयी अत्यंत अश्लील शब्दांत एक प्रतिक्रिया टाकली होती. आपल्या पोस्टमुळे भावना दुखावल्या जाणे तसेच दोन जातीमध्ये किंवा दोन गटात द्वेषाची भावना निर्माण होईल, याची कल्पना असताना देखील जाणीवपूर्वक इंस्ट्राग्रामवर ही पोस्ट टाकण्यात आली. त्यामुळे, याप्रकरणी आरोपीविरुद्ध ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर महायुतीची ताकद वाढली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय पक्का असल्याचं बोललं जात होतं. मात्र, जातीय रंग लागल्याने यंदाच्या निवडणुकीत बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी चांगलीच आघाडी घेतली. या दोन मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचा निकाल जाहीर झाला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केली होती. आरोपीनं काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला, तसेच व्हिडीओखाली आक्षेपार्ह पोस्टही लिहिली होती.
जिंतूर बंदची हाक
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील एका तरुणानं पंकजा मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे वाद निर्माण झाला. त्याच्या निषेधार्थ ओबीसी समाजाच्यावतीने जिंतूर बंदची हाक देण्यात आली होती. आज सकाळी आठ वाजल्यापासून जिंतूर शहरातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. कमेंट करणारा तरुण हा अल्पवयीन असून त्याच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. सध्या जिंतूरमध्ये शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.