(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : पत्नीने मुलाच्या मदतीने पतीचा काटा काढला, मुलीने सांगितला घडलेला प्रकार; नाशिकमधील घटना
Nashik Crime : नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी खुनाच्या (Murder) दोन घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
Nashik Crime : नाशिकसह जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने सुरूच आहेत. अशातच जिल्ह्यात एकाच दिवशी खुनाच्या (Murder) दोन घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात पत्नीने मुलाच्या मदतीने पतीचा खून (Husband Murder) केल्याचे समोर आले तर दिंडोरी परिसरातील अक्राळे एमआयडीसीत कामगारांमध्ये झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नाशिक (Nashik Crime) जिल्ह्याचा क्राईम रेट कमी होण्याची चिन्हे कमी होताना दिसत नाहीत.
नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात सततच्या गुन्हेगारीच्या (Crime) घटनांनी हादरत आहे. रोजच कुठे ना कुठे खून, प्राणघातक हल्ला, मारहाण, लूट, चोरीच्या घटनांनी ऊत आणला आहे. अशातच रविवारी एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. शहरातील पाथर्डी फाटा येथील यशवंत नगर परिसरातील एका अपार्टमेंटमधील सदनिकेत पत्नीने पतीच्या नात्यातले दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून मुलाच्या मदतीने पतीच्या डोक्यात मुसळी मारून खून केल्याची घटना घडली आहे. पती-पत्नीच्या नात्यात त्यांच्यात नात्यातील तिसऱ्या महिला आल्याने दोघांमध्ये झालेल्या वादात पतीने घर विकण्याची धमकी दिल्याने पत्नीने मुलाला सोबत घेऊन हे कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून संशयित पत्नी व मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
अनैतिक संबंधाच्या कारणातून गवळी पती-पत्नीमध्ये रविवारी रात्री वाद झाला होता. सुनीता गवळी यांनी दादाजी गवळी यांच्याकडे घर खर्चासाठी पैसे मागितले मात्र दादाजी गवळी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले होते. तसेच यावेळी गवळी यांनी त्यांच्या पत्नीला घर विकून टाकण्याची धमकीही दिली होती. त्याचा राग धरून मुलगा विशाल याच्या मदतीने सुनिता गवळी यांनी दादाजी गवळी यांचा खून केल्याचा आरोप अशोक गवळी यांनी त्यांच्या फिर्यादीत केला आहे. दरम्यान पत्नी आणि मुलाने अपघाताचा बनाव रचला. अपघात झाल्याचे अशोक गवळी यांना कळविले. मात्र दादाजी गवळी यांच्या डोक्यात मारहाणीच्या खुणा दिसून आल्याने तसेच गवळी यांची मुलगी निशा हीने चुलते अशोक गवळी यांना रात्री व पहाटे घडलेला प्रकार सांगितला. यावरून गवळी यांच्या खुनाचे सत्य उलगडल्याचे अशोक गवळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
दिंडोरीतील खून प्रकरण
दिंडोरी पोलिस (Dindori) स्टेशन हद्दीतील अक्राळे एमआयडीसीसमोर हा प्रकार घडला आहे. सोईराकुमार रामप्रवेश रिकीयासन हा एल अँड टी कंपनी येथे वास्तव्यास होता. त्याला झारखंड येथील राजकुमार बैजनाथ बियार याने रुमसमोर लघवी करतो, या कारणावरुन कुरापत काढुन चाकुने मनगटावर वार केले. या दोघांचे भांडण सुरू असताना अक्राळे परिसरात राहणारा, मूळचा बिहार येथील असलेला योगेश विश्वेश्वर रीकीयासन याने पाहीले. वाद टोकाला जाऊ नये व अघटीत घडु नये, यासाठी तो भांडण सोडविण्यासाठी गेला असता रागाच्या भरात राजकुमार याने योगेशच्या मानेवर डाव्या बाजुस चाकुने वार केला. यामध्ये योगेशचा मृत्यू झाला. दरम्यान, संशयीत राजकुमार यास अटक करण्यात आली आहे.