(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik : 'नाशिकच्या घराघरांत गुन्हेगारीचे आशिक....' इन्स्टाग्रामवरील रिल्स चर्चेत, पोलिसांचा वचक आहे की नाही!
Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) तरुणाईकडून खुलेआम गुन्हेगारी प्रवृत्तीचे इन्स्टा रिल्स सर्रास अपलोड केले जात आहेत.
Nashik Crime : नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी कळस गाठत असून आता रस्त्यावर, गल्लीत चौकात होणारी गुन्हेगारी सोशल मीडियावर (Social Media) दिसून येऊ लागली आहे. आता इंस्टाग्रामच्या माध्यमातून तरुणांकडून खुलेआम गुन्हेगारीला (Crime) प्रवृत्त करणारे रिल्स अपलोड केलं जातं आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील अपलोड होणाऱ्या रिल्सवर (Insta Reels) वाचक कुणाचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात वाढणारी गुन्हेगारी काही नवीन नाही. सातत्याने होत असलेले प्राणघातक हल्ले, लूटमार, खून या सारख्या घटनांनी नाशिक हादरत आहे. मात्र नाशिककरांना हे नेहमीच झाल्याने आता सवयीचा भाग झाल्याचे चित्र आहे. शहर पोलिसांकडून सातत्याने गुन्हेगारांची धरपकड केली जात असताना दुसरीकडे गुन्हेगारी कमी होण्याची नाव घेत नाही. हीच रस्त्यावरील गुन्हेगारी (Nashik Crime) आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून तरुणांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणारे रिल्स बनवले जात आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम गुन्हेगारांचा अड्डा बनत चालल्याचे चित्र आहे.
टिकटॉक बंद झाल्यापासून तरुण वर्ग इंस्टाग्रामवर (Instragram) सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र सुरवातीला गाणी, डान्स, कॉमेडीसारखे कंटेंट लोकांना पाहायला मिळत होते. आता नागरिकांमध्ये दहशत पसरविणारे रिल्स सर्रास अपलोड केले जात आहेत. नाशिक शहरातील अनेक तरुणांकडून अशा प्रकारचे रिल्स तयार केले जात आहेत. यात अल्पवयीन तरुणांचा देखील सहभाग असल्याचे व्हिडीओतुन दिसत आहे. एकीकडे शहरातील गुन्हेगारी आटोक्यात येत नसताना दूसरीकडे अशा पद्धतीने रिल्स बनवून शहराची प्रतिमा मलिन करण्याचे काम होत असल्याचे बोलले जात आहे. इंस्टाग्रामवर खुलेआम गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रिल्स पोस्ट केले जात आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण कोणाचं? हा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.
काय आहेत रिल्स?
दरम्यान नाशिकच्या विविध भागातून हे रिल्स पोस्ट केले जात आहेत. यात 'हे नाशिक आहे आणि ईथे घरा घरात गुन्हेगारीचे आशिक आहेत' अशा पद्धतीचा कंटेंट पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर 'MH 15 की पब्लिक डायरेक्ट 307 करती हैं', 'नाशिकच्या पोरांना नडून बघा, लॉकडाऊन नसतांना लॉकडाऊन करून टाकतील' नाशिकके बच्चो के साथ पंगा, तो.. अस्थिया भेजुंगा गंगा.. अशा प्रकारचे रिल्स तयार करून पोस्ट केले जात आहेत.
वचक कुणाचा हा प्रश्न?
इंस्टाग्रामवर रिल्स बनविण्याचा प्रकार हल्ली प्रचंड वाढला आहे. फेसबुकलाही इंस्टाग्रामने मागे टाकले आहे. त्यामुळे या माध्यमावर तरुणाईचा अतिरेकीपणा वाढला आहे. या रिल्सच्या दुनियेत त्यांना काय चांगलं व वाईट याची जाण नसल्याने भरकटणारा एक खूप मोठा वर्ग उदयास आला आहे. यात दहा वर्षांपासून ते तीस वयापर्यत तरुण वर्ग अग्रेसर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे फेसबुकची ग्राहक संख्या कमी होऊन सध्या इंस्टाग्रामचा ट्रेंड वाढला आहे. त्याला कॉलिंग, मेसेजिंग सुविधा आहे. त्याचबरोबर आता गुन्हेगारी, दहशत पसरविणारे रिल्स मोठ्या प्रमाणावर अपलोड केले जात आहेत. त्यामुळे यावर वचक कुणाचा असा प्रश्न निर्माण होत आहे.