Nashik Crime : इगतपुरीतून अल्पवयीन फूस लावून मुलीला पळवलं, जळगावात विकून लग्न लावलं, संशयितास अटक
Nashik Crime : इगतपुरीतून अल्पवयीन मुलीला फूस लावून जळगाव जिल्ह्यात विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) इगतपुरीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. करवंदे विक्रीसाठी आलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीला फूस लावून जळगाव जिल्ह्यात एक लाख रुपयात विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर मुलीची विक्री करून तिचे लग्न लावून देणाऱ्या संशयित महिलेसह दोन जणांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Thane) गुन्हा दाखल करून संशयितास अटक करण्यात आले आहे.
इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri) परदेशीवाडी येथील माहेर असलेली महिला सुरेखा योगेश पाटील हिची करवंदे खरेदी करताना एका अल्पवयीन गतिबंध मुलीची ओळख झाली. तिला विश्वासात घेऊन तिच्या गतिमंद पणाचा फायदा सुरेखा पाटील (Surekha Patil) या महिलेने घेत तिचा पती योगेश शांताराम पाटील यास याबाबत कळविले. या दोघांनी संगनमताने मुलीच्या घरच्यांना काही न सांगता अथवा संपर्क न करता मुलीला घोटी येथून जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात नेले. जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथे नेत मनोज राजू शिंपी यास एक लाख रुपयात विक्री केली. तसेच या प्रकाराची कुठेही वाच्यता न करता एका घरात लग्न लावून दिले. तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार झाल्याने तिने त्यास विरोध करण्यास सुरुवात केली.
मात्र घरादाराचा पत्ता देखील तिला व्यवस्थित कोणाला सांगता येत नसल्याने तिच्यावर महिनाभर अत्याचार झाला. नीट बोलता येत नसल्याने तिला मदतीला कुणालाही बोलावता येत नव्हते. दरम्यान पीडित मुलगी बेपत्ता झाली म्हणून तिच्या घरच्यांनी तालुक्यात शोध घेतला होता. अखेर त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात मुलीच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. यावरून नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फूस लावून नेणाऱ्या महिलेची पार्श्वभूमी पाहता गुप्त माहितीद्वारे सदर मुलीचा शोध घेऊन संशयितांना अटक केली आहे.
संशयितेचा पळून जाण्याचा प्रयत्न
दरम्यान पोलिसांनी संशयित महिलेची विचारपूस केल्यानंतर तिने घटनाक्रम सांगितला. याचवेळी गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू असतानाच महिलेने पोलीस ठाण्यातून चहा पिण्याच्या पाहण्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिला पुन्हा अटक केली. सदर संशयित महिलेने आधी अनेक तरुणांना विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. तसेच अनेक लग्न देखील लावून दिल्याचे विविध पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान संशयित आरोपींची सखोल चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी कार्यकर्त्यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :