(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Unseasonal Rain : शेतकऱ्यांनो! बँक खाते आधारला लिंक करा, अन्यथा अवकाळीची भरपाई मिळणार नाही
Nashik Unseasonal Rain : नाशिक (Nashik) जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने मदत दिली जात आहे.
Nashik Unseasonal Rain : नाशिक (Nashik) जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे (Crop Damage) नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने मदत दिली जाणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते आहे. त्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून आधारशी लिंक असेल, त्यालाच ही मदत मिळणार आहे. त्यामुळे सबंधित शेतकऱ्यांनी आपले बँक खाते (Bank Account Link Aadhar) आधार सोबत लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
नाशिकसह जिल्ह्याला (Nashik) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असल्याने अनेक भागात पंचनामे सुरु आहेत. महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले असून अनेक भागातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे हळूहळू नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई देण्यास सुरवात केली आहे. तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 या कालावधीत अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांचे शेतपिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना देखील मदत दिली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बँक खाते आधारशी लिंक करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान काही शेतकऱ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते आधारशी लिंक नसल्याने त्यांच्या खात्यावर मदतीचा निधी जमा होत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांची जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी बैठक घेतली. यावेळी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डी. गंगाथरन म्हणाले की, 7 ते 16 एप्रिल 2023 या कालावधीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याबाबतचे अ, ब, क, ड प्रपत्र 20 एप्रिल 2023 पर्यंत सादर करावेत. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे एप्रिल 2023 मध्ये नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँक खात्याशी आधार लिंक केले नाही त्यांनी ते आधार लिंक करून घ्यावे. याबाबत ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायकांकडे पंचनामे करतेवेळी माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक नुकसान
नाशिक मराठवाड्यासह (Marathwada) उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकं बाधित झाली आहेत. कांदा, द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या बागांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडं गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला या पिकांचेही नुकसान झालं आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्याती सर्वाधिक नुकसान झाले असून द्राक्ष पिकांसह कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 7 ते 16 एप्रिल या दहा दिवसातच अवकाळीमुळे जिल्ह्यातील 2 हजार 645 हेक्टरवरील द्राक्षफळपिकाला फटका बसला असून सर्वाधिक नुकसान दिंडोरी तालुक्यात झाले आहे.