Nanded Rain: नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती, 57 मंडळात अतिवृष्टी; तब्बल 378 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
Nanded Rain News : 28 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील 57 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.
Nanded Rain News : मागील काही दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात होणाऱ्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. तर शुक्रवारी देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ज्यात जिल्ह्यातील 57 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहे. तर शेकडो एकर पाण्याखाली गेल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासन प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत प्रशासनाने दिलेली माहिती...
28 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील 57 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात पाऊस थांबलेला आहे. किनवट तालुक्यातील चिखली खु. येथे नाल्याचा पूर ओसरला आहे, परंतु रस्ता बंद आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक चालू आहे. बेल्लोरी किनवट येथील बेलोरी नाल्या वरून एक व्यक्ती वाहुन गेली असून, ज्यांचे नाव अशोक पोशट्टी दोनेवार (वय 40 वर्ष) आहे. भोई समाजाचे लोक मदतीला घेऊन शोध बचावकार्य चालू होते. मुखेड तालुका मौजे राजुरा बु येथील युवक प्रदीप साहेबराव बोयाळे (वय वर्ष 25) पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेल्याची प्राथमिक माहिती असून, त्याचा मृतदेह सापडला आहे आहे.
उमरी मुदखेड रस्ता रेल्वे पुलाच्या खाली पाणी असल्यामुळे मागील 8 दिवसापासून बंद आहे. धर्माबाद तालुक्यातील बनाळी येथे अति पावसामुळे 60 ते 70 कुटुंबाचे दोन बसेस द्वारे धर्माबाद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलेले आहे. उमरी तालुक्यात बेलदरा ते उमरी रस्ता बंद आहे. किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील साईबाबा मंदिराजवळील नाल्याचे पाणी पुलावरून जात असताना हर्द के नावाचे इसम पाण्यात अडकले होते. या इसमाचा बचाव करण्यासाठी महसूल विभागाचे तलाठी बालाजी वसमतकर हे स्वतः पाण्यात उतरून सदर इसमाला धोक्याच्या पातळीबाहेर काढले. त्यानंतरही पाण्याचा प्रवाह वाढतच होता. वाढणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर आत्ता पूर्णपणे बाहेर येणे शक्य नव्हते. त्यामुळे पुढे मंडळ अधिकारीशिवनी आणि पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने JCB च्या मदतीने सदर इसम आणि तलाठी वसमतकर याना सुखरूप बाहेर काढले. एका इसमाच्या बचावासाठी महसूलचे तलाठी बालाजी वसमतकर यांनी दाखविले प्रसंगावधान आणि धाडस कौतुकास्पद आहे अशी सर्वत्र चर्चा होत आहे.
जिल्ह्यातील दोन दिवसांची पावसाची परिस्थिती
1) मुदखेड तालुक्यातील आनंदराव गुंडाजी पवार, गयाबाई आनंदराव पवार, गजानन आनंदराव पवार, लता गजानन पवार, आनंद गजानन पवार, मिना आनंदराव पवार हे वैजापूर पारडी येथे घराला पुराच्या पाण्याने घेराव घातला होता. स्थानिक लोकांनी या लोकांना सुखरूप बाहेर काढल्याचे तहसिलदार मुदखेड यांनी कळविले आहे.
2) धर्माबाद पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे बनाळी गावातल्या एका परिवाराला पुरात वाहून जाताना जीवनदान, पोलिसांनी पांचाळ कुटुंबीयांना बाहेर काढले.
3) उमरी तालुक्यातील सावरगावं कला येथील तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तूर्तास गावाला धोका नाही
4) धर्माबाद तालुक्यातील सिरजखोड ब्रीज पाण्याखाली गेल्याने बामणी, विलेगाव, संगम, मनुर या गावाचा संपर्क तुटला आहे. त्यांना पर्यायी मार्ग कुंडलवाडी आहे.
5) भोकर तालुक्यात मौ. नांदा म्हेता येथे 15 ते 16 घरात पाणी शिरुन जनावरे व धान्यांची हानी झालेली आहे.
6) नांदेड शहरातील बसवेश्वर नगर येथील विठ्ठल रामचंद्र कापावार (वय 40) लातूर फाटा येथून वाहून गेले होते. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला आहे.
7) नांदेड तालुक्यातील कासारखेडा गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 6 जणांना SDRF टीमने सुखरुप बाहेर काढले आहे.
8) मुदखेड तालुक्यातील नागेली गावामध्ये मातंग वाडा येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 25 व्यक्तींना सुरक्षित जागी (समाज मंदिर) हलवण्यात आले आहे.
9) मुदखेड तालुक्यातील शेंबोली गावामध्ये शंबोली फाट्यावरील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 30 व्यक्तींना सुरक्षित जागी (प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबोली) हलवण्यात आले आहे.
10) मुदखेड तालुक्यातील बारड गावातील 12 जणांना SDRF टीमने सुखरुप बाहेर काढले
11) मुदखेड तालुक्यातील बारड गावांमध्ये इंदिरानगर शंकरनगर पांदन व भीमनगर येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 10 कुटुंबातील 35 व्यक्तींना सुरक्षित जागी (गावातील नातेवाईक यांचेकडे) हलवण्यात आले व इतर कुटुंबासाठी जि. प. येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
12) मुदखेड तालुक्यातील बोरगांव सिता या गावातील 2 शेतकऱ्यांना SDRF टीमने सुखरुप बाहेर काढले.
13) मुदखेड तालुक्यातील हजापूर येथील पुरात अडकलेले शेतकरी दिलीप वामनराव कदम (वय 54 ) यांचे सुखरूप रेस्क्यू करण्यात आले.
14 ) मुदखेड तालुक्यातील सरेगाव गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे 23 कुटुंबातील 87 व्यक्तींना सुरक्षित जागी (गावातीलत्यांचा नातलगांच्या घरी) या ठिकाणी हलवण्यात आले
15) अर्धापुर तालुक्यातील लोणी खु. येथील मंदीरात पुराच्या पाण्यात अडकून बसलेल्या एका व्यक्तीस ग्रामस्थांच्या बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले
16) अर्धापुर तालुक्यातील स्वप्नील शंकरराव कदम (वय 26 वर्ष रा कोंढा) ही व्यक्ती मौ गणपूर येथे पुराच्या पाण्यामध्ये विद्युत खांबावर लटकून 2 तासापासून अडकून होते. यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये SDRF टीमच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: