ठाण्यानंतर आता नांदेड हादरलं! शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 24 जणांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचा मृतात समावेश
Nanded : रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, वेळेवर औषधे पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप केला जात आहे.
नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे शहराच्या महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) चोवीस तासात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, वेळेवर औषधे पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप केला जात आहे.
हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औधधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात 12 नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. दरम्यान यावर रुग्णालय प्रशासनाने प्रतिक्रिया दिली असून, या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा केला आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतेय.
मृतांमध्ये कोणाचा समावेश?
- नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू
- मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे.
- 48 तासांत जन्माला आलेले 6 तर 24 तासांत जन्माला आलेल्या 6 बालकांचा मृत्यू
- सर्पदंशावर उपचार घेणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे.
- वेगवेगळ्या गंभीर आजारांमुळे यातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
- प्रसूतीवेळी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
- तसेच हृदयविकाराच्या झटक्याने दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
चौकशी समिती नेमणार...
दरम्यान नांदेड येथील घडलेल्या घटनेच्या संदर्भात चौकशी समिती नेमली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. सोबतच आपण स्वतः रुग्णालयात जाऊन पाहणी करणार असल्याचे देखील मुश्रीफ म्हणाले आहेत. तर, "हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे हे चौकशी केल्याशिवाय समजणार नाही. आमचे आयुक्त तत्काळ आजच तिकडे निघणार आहे. तसेच मी देखील उद्या जाऊन सर्व घटनेचा आढावा घेणार असल्याचे," मुश्रीफ म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: