Nanded News: कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलाची विष प्राशन करुन आत्महत्या, नांदेडमधील घटना
Nanded News : कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नांदेडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
Nanded News : नांदेडमध्ये (Nanded) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलाने (Couple) विष प्राशन करुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील दर्याबाई उमरी या गावात ही घटना घडली आहे. अंजली थोरात आणि आकाश वाठोरे अशी मृत तरुण आणि तरुणीचे नाव आहे. दोघांनी एकत्र विष प्राशन करुन आपली जीवन यात्रा संपवली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, "मृत अंजली थोरात आणि आकाश वाठोरे यांचे प्रेमसंबंध (Love Affair) होते. अंजली ही मूळची अर्धापूर तालुक्यातील पांगरी या गावाची रहिवासी होती. तिच्या आईचा मृत्यू झाल्याने ती आजोळी ऊमरी दर्या येथे मामाकडेच राहत होती. याच गावातील आकाश वाठोरे याच्यासोबत तिची मैत्री झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही शिक्षणासाठी हदगावला ये-जा करत होते."
प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यानंतर तरुणीचं नात्यातील मुलासोबत लग्न
दोघांमध्ये तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अंजलीच्या कुटुंबाला दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. तिच्या वडिलांनी आणि आजोबांनी या संबंधाला नकार दिला. त्यानंतर अंजलीचे लग्न नात्यातील मुलासोबत लावून देण्यात आलं. लग्न झाल्यानंतरही आकाश आणि अंजलीमध्ये संवाद सुरु होता. 28 मार्च रोजी मुलगी नांदेडला आली होती. तेव्हा तिला आकाशने गाडीवर गावी आणले. पण ही माहिती आजोबांना समजली आणि त्यांनी दोघांवर राग काढला. पुढे देखील आपल्या संबंधाला मान्यता मिळणार नसल्याने दोघांनी 30 मार्च रोजी विषप्राशन केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवला उशिरा प्राप्त झाल्याने आज मनाठा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे
नात्यातल्या मुलाशी प्रेमंसंबंध, भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनी पोटच्या मुलीला संपवलं
दोन महिन्यांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील महापाल पिंपरी इथे धक्कादायक प्रकार समोर आला होता. नात्यातल्या मुलाशी प्रेमंसंबंध असल्याने घरच्यांनी मुलीची हत्या केली. भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनीच मुलीची हत्या केल्याचा समोर आलं. ही तरुणी नांदेड इथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. मृत मुलीच्या मैत्रिणीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्याने हा सगळा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीचे वडील, भाऊ, मामा आणि दोन चुलत भावांविरोधात गुन्हा दाखल केला होता.