(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded: नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी; धक्कादायक आरोप
Aurangabad News: विमा कंपनीच्या प्रतिनिधी यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Nanded News: मराठवाड्यातील परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. मात्र असे असतानाच नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. शेतात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या विमा कंपनीच्या प्रतिनिधी यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अवकाळी, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे पिकांची अक्षरशः धूळधाण झालीय. सोयाबीन उडीद, मूग ,कापूस या हाताला आलेली पीकं मातीमोल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. तर पीक विमा कंपन्यांकडून पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. मात्र पंचनामे करण्यासाठी आलेल्या विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप केला जात आहे. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील कोथळा गावात मोठ्याप्रमाणावर पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संबधित विमा कंपनीचे प्रतिनिधीनी आले होते. मात्र पिकांचे 100 टक्के नुकसान दाखवण्यासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
विम्याचे कागदपत्रे फेकून दिली...
सततच्या पावसाने कोथळा गाव परिसरातील सोयाबिन, उडीद, मूग, कापूस पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने पीकं अक्षरशः वाहून गेली आहे. याच गावातील शेतकरी केशवराव नाजुराव देवसरकर यांच्या शेतात सुद्धा मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र त्यांनी पीक विमा काढला असल्याने विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतात जाऊन पाहणी केली. मात्र विमा प्रतिनिधी यांनी केलेल्या पैश्यांची मागणी पूर्ण न केल्याने त्यांचे पीक विम्याचे कागदपत्र कंपनीच्या प्रतिनिधींनी अक्षरशः फेकून दिली असल्याचा आरोप देवसरकर यांनी केला आहे.
नांदेड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान...
नांदेड जिल्ह्यात सुरवातीपासूनच जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. त्यातच आता परतीच्या पावसाने देखील अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याने, बळीराजा हतबल झाला आहे. सोयाबिन, उडीद, मूग, कापूस पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यातच सरकारने मदतीची घोषणा केली खरी, मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईचा मोबदला जमा झाला नसल्याचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने नांदेडच्या शेतकऱ्याने केली आत्महत्या
Nanded: नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यातील आणखी 9 गावं लम्पी बाधीत क्षेत्र म्हणून घोषित